आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना इफेक्ट : मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट; तब्बल ५.८ अब्ज डॉलर्सची घसरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने आपला फटका दिल्याने प्रख्यात भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे आता आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिलेले नाहीत. व्हायरसच्या फटक्याने जगभरात तेलाचे भाव कोसळल्याने शेअरबाजारात मंदी आल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ५.८ अब्ज डॉलर्सची घसरण झाल्याने आता मुकेश अंबानी नव्हे तर अलिबाबा ग्रुपचे जॅक मा हे आशियातील सर्वात जास्त श्रीमंत उद्योगपती ठरलेले आहेत. आशियातील सर्वोच्च श्रीमंतात मुकेश अंबानी यांचा आता दुसरा क्रमांक असेल. ब्लूमबर्ग बिलिनेअर्सने ही माहिती दिली.

अलिबाबा ग्रुपचे जॅक मा हे ४४.५ अब्ज डॉलर्सचे म्हणजे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा २.६ अब्ज डॉलर्सने जास्त संपत्ती असलेले उद्योगपती बनले आहेत. जागतिक तेलबाजारात सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात बाजारात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ सुरू झाल्याने त्याचा परिणाम तेलाचे भाव कोसळण्यात झाला. गेल्या २९ वर्षांत प्रथमच ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यात पुन्हा कोरोना व्हायरसमुळे तेलाच्या मागणीत घट झाली आहे. रिलायन्सच्या ऑइल अँड पेट्रोकेमिकल्स विभागाचे काही शेअर्स जगात सर्वात जास्त क्रूड तेलाचे उत्पादन करणाऱ्या सौदी अरेबियाच्या तेलकंपनीला विकले जाणार होते. पण मंदी आणि व्हायरसमुळे या मोठ्या व्यवहारापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या शेअरविक्रीतून २०२१ पर्यंत कंपनीवर असलेले कर्ज शून्यावर आणण्याचा रिलायन्सचा बेत होता.

अलिबाबाला तारले 

या जागतिक मंदीच्या धोक्यात जॅक मा यांची अलिबाबा कंपनी सापडली असली तरी क्लाऊड काॅम्प्युटिंग आणि मोबाइल अॅप्सची वाढत चाललेल्या मागणीमुळे अलिबाबा कंपनीला दिलासा मिळालेला आहे. रिलायन्स कंपनीला असा कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोमवारी रिलायन्स कंपनीच्या शेअरमध्ये १२ टक्के घट झाली. २००९ नंतर प्रथमच कंपनीला अशा संकटाला सामोरे जावे लागत आहे. अलिबाबा कंपनीच्या शेअर्सची किंमत ६.८ टक्क्याने घसरली आहे.

कारण, खेळ अजून संपलेला नाही !

तरीही या स्थितीतून मुकेश अंबानी लवकरच बाहेर येतील, असा विश्वास बंगळुरूच्या इ क्यूब इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय भागीदार हरिश एचव्ही यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले की, खेळ अजून संपलेला नाही. अंबानी यांनी मोठे औद्योगिक साम्राज्य हुशारीने उभे केले आहे. शिवाय चालू वर्षात टेलिकॉम व्यवसायातूनही त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
 

बातम्या आणखी आहेत...