आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली/परभणी - परभणी आणि हिंगाेली जिल्ह्यात काेराेना व्हायरसच्या भीतीने पोल्ट्री व्यवसायावर अवकळा आली आहे. पाेल्ट्री व्यावसायिकाला तीन किलो वजनाची कोंबडी जगवण्यासाठी २१५ रुपये खर्च येताे. मात्र सध्या बाजारात अनेक ठिकाणी काेणी काेंबडी फुकटही घ्यायला तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठी घरघर लागली असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या दरेगाव (ता.औंढा नागनाथ) येथील कुक्कुटपालन करणाऱ्या दोन व्यावसायिकांनी २१००० कोंबड्या गुरुवारी जिवंत गाडून टाकल्या. शासनाने या व्यावसायिकांना अनुदान द्यावे, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. काल बुधवारी हिंगोली येथे पोल्ट्री चालकांनी जिल्हा प्रशासनाला एक निवेदनही दिले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथील सुनील जाधव व लक्ष्मण जाधव यांनी मागील काही वर्षांतील सतत नापिकीमुुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून बॉयलर पोल्ट्री फॉर्म नावाने कुक्कुटपालन सुरु केले. या व्यवसायासाठी त्यांनी खासगी बँकेचे तीन लाख रुपये, तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे ५० हजार रुपयांचे कर्जही घेतले आहे. या पैशातून कोंबड्यांसाठी मका, सोयाबीन पावडर व इतर औषधी खरेदी केली जाते. या ठिकाणी असलेल्या २१००० कोंबड्या जगवण्यासाठी चाळीस हजारांचे खाद्य लागत आहे.
मात्र सध्या कोरोना विषाणूमुळे कोंबडी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. कोंबडी व अंडी देखील कोणी खरेदी करीत नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कोंबड्यांना जगवण्यासाठी दररोज लागणारा पैसा कुठून उभारावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात कोंबड्यांची व अंड्यांची मागणी घटल्याने कोंबडी सांभाळण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. दररोज पैसे उभे करावे लागत असल्याने अखेर कंटाळून या दोघांनीही गावालगत दहा बाय दहा आकाराचे दोन खड्डे खोदून त्यात २१ हजार लहान-मोठ्या कोंबड्या गाडून टाकल्या आहेत. कोंबड्या गेल्यानंतर आता उधारी फेडावी कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
एक कोंबडीचे तीन किलो वजन करण्यासाठी पशुखाद्य व इतर खाद्यासाठी २१५ रुपये खर्च करावे लागतात. मात्र सदर रक्कम खर्च करून देखील सध्या बाजारात कोंबडी व अंडी यांची मागणी घटली आहे. कोंबडीच्या पिल्लांसाठी लागणारे पशुखाद्य घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे अंडी फोडून टाकण्याची वेळ आली आहे. काही व्यावसायिकांनी बँकेकडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सरू केला आहे. त्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सव्वादोन लाख कोंबड्यांचे करायचे काय ?
जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी बुधवारी जिल्हाभरातील पन्नास पोल्ट्री व्यावसायिक आले होते. या व्यावसायिकांकडे एकूण २ लाख २५ हजार कोंबड्या आहेत. या कोंबड्यांकडून अंडी देणे सुरू असून त्यातूनही कोंबड्या तयार होत आहेत. सद्यःस्थितीत सव्वादोन लाख कोंबड्यांचे करायचे काय, असा प्रश्न पोल्ट्री व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.
परभणीतही जिल्हा प्रशासनाकडे मांडल्या व्यथा
चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होत असल्याची अफवा पसरल्याने या व्यवसायात मोठी मंदी आली आहे. बाजारभाव दररोज घसरत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक अत्यंत बिकट स्थितीत व्यवसाय करीत आहेत. परभणी जिल्ह्यात तीन ते साडेतीन लाख जिवंत पक्षी आहेत. या पक्ष्यांवर होणारा खर्च मोठा आहे.
८ ते १० रुपये भाव
बाजारभाव ३२ ते ३६ रुपयांवर आल्याने व्यापारी व किरकोळ विक्रेते व्यावसायिकांना केवळ ८ ते १० रुपये किलोचा भाव देत असल्याने हे व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. या अनुषंगाने प्रशासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना अनुदान मिळून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रकाश देशमुख, नामदेव खटिंग, सलीम खान अहेमद खान पठाण, भाऊसाहेब कदम, मो.उस्मान अन्सारी अरफात, शेख उस्मान शेख चाँद, विश्वनाथ बोबडे, बालाजी गव्हाणे आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.