आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना आपल्या दारी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिनाभरापासून ज्याने साऱ्या जगाला चिंताक्रांत करून सोडले आहे तो काेरोना विषाणू संसर्ग अखेर अगदी आपल्या दारात म्हणजे पुण्यात येऊन पोहाेचला आहे. विचित्र योगायोग म्हणजे रंगोत्सवाच्या काळातच लोकांचा बेरंग करणारी ही कुवार्ता येऊन धडकली आहे. अशा स्थितीत एकदम हातपाय न गाळता आरोग्य यंत्रणेला सक्रियपणे आणि सकारात्मकतेने साथ देण्याची गरज आहे. काेरोना प्रतिबंधाची जबाबदारी केवळ सरकार किंवा प्रशासकीय यंत्रणेची नसून तुम्हा-आम्हा सर्वांची आहे. त्यामुळे या अवघड प्रसंगाचा सामना धीराने आणि योग्य ती खबरदारी घेत शांत डोक्याने करण्याची गरज आहे. चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या या विषाणू संसर्गावरील उपचारांबाबत अजूनही सगळीकडे संभ्रमावस्था आहे. चिनी यंत्रणेच्या पोलादी भिंतीतून प्रथम ही बातमी बाहेर येण्यासच दीर्घ काळ लागला. त्यानंतर त्याचा प्रसार आणि बाधित रुग्ण संख्या याची चर्चा सुरू झाली. अफवांचे पीक आले. समाजमाध्यमांवरून कोरोनाग्रस्तांची संख्या, तिथली स्थिती, ज्या वुहान प्रांतात त्याची सर्वाधिक लागण झाली आहे तेथील अवस्था, चित्रफिती, मृतांची संख्या याविषयी वेगवेगळ्या स्वरूपाच्या माहितीचे प्रवाह अनिर्बंधपणे वाहू लागले. साहजिकच त्यातून कोरोनाविषयी एकप्रकारची जबरी दहशत उत्पन्न झाली. दोन आठवड्यांपासून तर या विषाणूची लागण अन्यत्र होऊन पूर्व आशियासह युरोप आणि थेट अमेरिकेतही कोराेनाग्रस्त आढळून यायला लागले. जगभरात एकच खळबळ उडाली. मार्चच्या सुरुवातीला आपल्याकडेही दिल्ली, आग्रा तसेच केरळमध्ये काही कोरोनाग्रस्त आढळून आले होते. अद्याप त्याचा शिरकाव महाराष्ट्रात झाला नसल्याने आपण एकूणातच त्याकडे काहीशा तटस्थपणे पाहात होतो. पण, आता मात्र अंग झटकून या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. कारण, दुबई येथे जाऊन आलेल्या पुण्याच्या दाम्पत्यापैकी एकाला कोरोनाने ग्रासल्याचे निदान नुकतेच झाले आहे. अर्थात, त्यामुळे एकदम घाबरून जाण्याचे कारण नाही. या समस्येला मानसिक पातळीवर संयमाने आणि शारीरिक पातळीवर निर्धाराने सामोरे जायला हवे. शरीरावर कोरोनामुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांविषयी सरकार तसेच प्रशासन अशा दुहेरी स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आपली आरोग्य यंत्रणादेखील त्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जाते. शिवाय, इथले एकूणच वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण वगैरे बाबींना तोंड देत घडत गेलेली आपली प्रतिकारशक्ती अन्य ठिकाणच्या तुलनेत अशा साथरोगांशी लढण्यासाठी बऱ्यापैकी सक्षम असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. आता ऊन जसे वाढेल तसे ते कोरोना प्रतिबंधासाठी पथ्यावर पडेल, असाही दावा करण्यात येत आहे. शिवाय, बाहेरून येणाऱ्या मंडळींची विमानतळापासूनच तपासणी वगैरे व्यवस्थाही कार्यान्वित झाल्या आहेत. पुण्याच्या कोरोनाग्रस्त दाम्पत्याचीसुद्धा अशी तपासणी झाली आणि त्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याने वेळीच त्यांच्या संसर्गाचे निदान झाले. आता त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याला उभयतां योग्य प्रतिसाद देत असल्याची बाब समाधानकारक म्हणावी लागेल. जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर विचारात घेतला तरीसुद्धा कोरोनाचा जेवढा बागुलबुवा उभा करण्यात आला आहे तेवढा तो घातक नसल्याचे स्पष्ट होते. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा दर दोन टक्क्यांहूनही कमी आहे. भारतात तर सुदैवाने कोरोनामुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. हे लक्षात घेतल्यास कोरोनाच्या भीतीने गर्भगळीत होण्याचे कारण नाही. पण, म्हणून दुसऱ्या बाजूला कोरोनाकडे सहजतेने पाहण्याऐवजी त्याचा मुकाबला सजगतेने करावा लागेल. त्यासाठी सरकार, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणांच्या प्रयत्नांना साथ देणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. स्वत:सह कुटुंबीय वा परिचितांपैकी कुणी आजारी असल्यास तातडीने त्यावर वैद्यकीय उपचाराची खबरदारी घ्यायला हवी. परदेशी जाऊन आलेल्या आप्तेष्टांकडे तपासणीचा आग्रह धरून त्यांची माहिती स्थानिक यंत्रणेला वेळीच देण्याची खबरदारी बाळगायला हवी. शिंकताना, खोकताना नाका-तोंडासमोर रुमाल धरायला हवा, आवश्यक तिथे मास्क वा अन्य उपाययोजना करायला हव्यात. एवढे जरी झाले तरी काेरोनाविरुद्धच्या लढाईत सामान्य शिलेदार म्हणून मोठे योगदान दिले जाईल. हे करतानाच आणखी एका गोष्टीचे भान बाळगणे अात्यंतिक आवश्यक आहे. ती बाब म्हणजे मनावरचा ताबा किंवा संयम. कारण, हल्ली समाजमाध्यमांवरच्या विविध व्यासपीठांवर अगदी समंजस, उच्चशिक्षित म्हणवली जाणारी मंडळीसुद्धा संयमाला तिलांजली देत असल्याचे दिसते. कशाचीही शहानिशा न करता सर्रास मेसेज ‘फॉरवर्डस्’ केले जातात आणि त्यातून भीतीचा, अस्वस्थतेचा राक्षस जन्म घेताे आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे किमान सद्यस्थितीत तरी आपण सर्वांनीच कोणत्याही माहितीची देवाण-घेवाण चुकीच्या पद्धतीने होणार नाही याची दक्षता सर्वप्रथम घ्यायला हवी. एवढे भान बाळगले तरी अफवांना, अपसमजांना, दिशाहिनतेला मोठा आळा बसेल आणि मूळ समस्येच्या निर्दालनावर सर्व लक्ष केंद्रित करता येईल.  

बातम्या आणखी आहेत...