आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना खासगी डॉक्टरांनी त्यांचे क्लिनिक सुरू ठेवणे गरजेचे आहे. कोरोना संशयित रुग्णांबरोबरच ‘नॉन कोविड’ रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे सरकारकडूनही वारंवार सांगितले जात आहे. डॉक्टर, त्यांचा सहकारी स्टाफ आणि रुग्णालयात येणाऱ्या ‘नॉन कोविड’ रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम उपाय ठरू शकेल असे अनोखे ‘डिजिशील्ड’ नावाचे अॅप विकसित करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या वापरासाठी ते नि:शुल्क उपलब्ध करण्यात आले आहे.
बहुतांश शहरांत कोरोनाने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे क्लिनिक उघडून अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यास तयार असलेल्या डॉक्टरांपुढेही सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक क्लिनिक वा हॉस्पिटलमध्ये कोरोना संशयित रुग्णाच्या हाताळणी आणि त्यांच्यावरील उपचाराबाबत काही प्रमाणात गोंधळाची स्थिती दिसून येत आहे. यामध्ये विशेषत्वाने डॉक्टर आणि तेथील स्टाफच्या सुरक्षिततेचा मुद्दा कळीचा ठरतो आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले हे अॅप डॉक्टरांसाठी सुरक्षेची ढाल ठरु शकते. ‘फिग एमडी इनकार्पोरटेड, अमेरिका’ या गुगल व्हेन्चरच्या सहाय्याने, अमेरिकेतील सुमारे चाळीस टक्के रुग्णांच्या आरोग्यविषयक माहितीचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचे संस्थापक -अध्यक्ष संकेत बराले यांनी हे ‘डिजिशील्ड’ अॅप विकसित केले आहे. या क्षेत्रातील त्यांचा अनुभव, कुशल टीम आणि ‘एआय’चा प्रभावी वापर यातून तयार झालेले हे अॅप कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि आरोग्यसेवकांसाठी ‘डिजिटल कवच’ म्हणून उपयुक्त ठरेल.
असे काम करेल ‘डिजिशील्ड’...
> क्लिनिकमध्ये तपासणीसाठी येऊ इच्छिणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांकडून या अॅपव्दारे एक लिंक पाठवली जाते.
> रुग्णाने ही लिंक ओपन केल्यावर ‘डिजिशील्ड’चा ‘एआय’ एजंट त्याच्याशी चॅटिंग करत नाव, वय, पत्ता, आजार व लक्षणे, ‘क्लिनिकल हिस्ट्री’ आदी माहिती तसेच त्याच्या चेहऱ्याचा, जिभेचा फोटो आणि आवाजाचे सॅम्पल घेतो.
> त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत या सगळ्या माहितीचे, तसेच सदरचा रुग्ण कंटेन्मेंट झोनमधील आहे वा कसे, याचे ‘एआय’ अल्गोरिदम वापरून विश्लेषण केले जाते. त्यानुसार संबंधित रुग्ण कोरोनाबाधित असणयाची शक्यता आहे की नाही, याचा डॉक्टरांना तसा अंदाज कळवला जातो.
> लो रिस्क असलेल्या रुग्णांना काही मिनिटांत एक हेल्थ ओटीपी पाठवला जातो व त्या रुग्णाला लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट दिली जाते.
> हाय व मॉडरेट रिस्क असलेल्या रुग्णांच्या उपचाराच्या पहिल्या टप्प्यात टेलिमेडिसीनचा वापर करण्यास डॉक्टरांना सुचवले जाते. त्यानंतरही उपचाराची गरज पडल्यास त्या रुग्णाला ‘ओपीडी’ शिवाय इतर वेळी बोलावण्यासाठी सुचवले जाते. डॉक्टरांना अधिक सुरक्षा साधनांचा वापर करीत तपासणी व उपचाराचा पर्याय वापरता येईल.
आरोग्यसेवा पुनर्स्थापित करण्यास उपयुक्त
कोरोनाने आपल्याला चाकोरी सोडून ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करायला भाग पाडले आहे. आज डॉक्टर आणि दवाखान्यात जाऊ इच्छिणाऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच आम्ही ‘डिजिशील्ड’ विकसित केले. योग्य निदान आणि उपचारासाठी डॉक्टर व रुग्ण यांच्यात गरजेचा असणारा प्रत्यक्ष भेटीतील सुसंवाद, सध्याची स्थिती लक्षात घेता दोघांसाठीही अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी याची मदत होऊ शकेल. शिवाय, आपली आरोग्य सेवा व्यवस्थाही तातडीने पुनर्स्थापित करण्यास ते उपयुक्त ठरू शकेल. - संकेत बराले, संस्थापक - अध्यक्ष, फिग एमडी इनकार्पोरटेड, अमेरिका.
हे आहेत फायदे…
> क्लिनिकमध्ये येण्यापूर्वीच डॉक्टरांना प्रत्येक श्रेणीतील रुग्णाच्या स्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो.
> हाय रिस्कमधील रुग्णाचा अजाणतेपणे होऊ शकणारा थेट संपर्क टळल्याने डॉक्टरांप्रमाणेच तेथील कर्मचारी व अन्य रुग्णांचा संभाव्य धोका टळतो.
> ‘मी दवाखान्यात गेलो व तिथे कुणी कोरोनाबाधित रुग्ण असेल, तर मलाही संसर्ग होऊ शकतो’ ही दवाखान्यात जाऊ इच्छिणाऱ्यांची भीती कमी होऊ शकेल.
> ‘नॉन कोविड’ रुग्णांना तातडीने व सुलभपणे उपचार मिळू शकतात.
> डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहित असताना त्याच वेळी हाय / मॉडरेट रिस्क असलेल्या रुग्णाच्या मोबाइलवरही प्रिस्क्रिप्शन पोहोचेल.
> रुग्णांच्या एकत्रित डेटाचे ‘एआय’ इंजिनव्दारे अचूक विश्लेषण होत असल्याने शहराच्या एखाद्या भागात कोणता आजार / साथ बळावतेय ते लगेच समजेल. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवणे शक्य होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.