आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना विषाणूची महाराष्ट्रात धडक, पुण्यात पाच जणांना बाधा; नाशिकरोडला दोन महिला कोरोना संशयित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : कोरोना विषाणूची बाधा पुण्यात आणखी दोघांना झाल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी समोर आली असून आता पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. तर या तिघांनी ज्या ओला टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सीचालकालाही काेरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. हा ओलाचालक मुंबईचा असल्याची शक्यता वर्तविली जात असून हा चालक मुंबई आणि पुण्यात ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुण्यात दुबईतून आलेल्या एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारीच उघड झाले होते. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या यवतमाळमधील एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली होती. या दाम्पत्याची मुलगी आणि त्यांनी मुंबई ते पुणे ज्या ओला कंपनीच्या टॅक्सीतून प्रवास केला होता, त्या टॅक्सीचालकाचीही तपासणी करण्यात आली होती. मंगळवारी या दोघांचे चाचणी अहवाल आले असता त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर तातडीने नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची पृष्टी केली आहे. दरम्यान, हे दाम्पत्य ज्या ४० लोकांसोबत दुबईला गेले होते, त्यांचीही तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवाशांची तपासणी

१० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील एक लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या काेरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशांतून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

३०४ पैकी २८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यात आजपर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर तीन जण मुंबईत भरती आहेत.
 

  • कोरोना व्हायरसविरुद्ध, युद्ध आमुचे सुरू..; इराणहून ५८ भारतीय विमानाने मायदेशी
  • कराचीत एकाच दिवसात नऊ प्रकरणे उजेडात, एकूण संख्या वाढून सोळावर
  • जपानमध्ये संकट अधिकच गहिरे; आकडा ५१० पार
  • दक्षिण कोरियात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७५१३
  • कोरोनाबाबत अधिक माहितीसाठी हेल्पलाइन : राज्य नियंत्रण कक्ष : ०२०/२६१२७३९४, टोल फ्री क्रमांक १०४, ९१११३९७८०४६

नाशिकरोडला दोन महिला कोरोना संशयित, जिल्हा रुग्णालयात दाखल

नाशिकरोड : कोरोनो विषाणूची बाधा झाल्याच्या संशयातून नाशिकरोड परिसरातील दोन महिलांना जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आल्याचे बिटको रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिकरोड परिसरात रहाणारी एक मुलगी दुबईवरून दोन दिवसांपूर्वी आली. तिला सर्दी-खोकला सुरू झाल्याने तिची तपासणी करण्यात आली. खबरदारी म्हणून तिच्या आईलाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष पथकाच्या निगराणीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे.
 
इराणहून भारतीयांना एअरलिफ्ट करुन आणणाऱ्या विमानातील प्रवाशांची स्क्रिनिंग टेस्ट करताना वैद्यकीय पथक.