आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल मंदिराची दर दोन तासांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पंढरपुरात जनजागृतीसाठी लावणार फलक, शिर्डीत नागरिकांत घबराट

पंढरपूर- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना सर्वच पातळ्यांवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जाऊ लागली आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर प्रशासनानेही त्याच दिशेने पावले टाकत स्वच्छतेला अग्रक्रम देण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक दोन तासांना म्हणजेच दिवसातून १० ते १२ वेळा संपूर्ण विठ्ठल मंदिरात साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


याबरोबरच कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत भाविकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मंदिराच्या नामदेव पायरी, पश्चिमद्वार तसेच दर्शनरांगेत विविध ठिकाणी फलक लावण्याचेदेखील नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. 

विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज लाखभर भाविक पंढरपुरात येत असतात.
यात काही परदेशी भाविकांचाही समावेश असतो. अशा वेळी दर्शनरांगेत असणारी गर्दी आणि संसर्गजन्य जंतूंचा होणारा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण विठ्ठल मंदिराच्या सफाईला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, शिर्डीतही नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले अाहे. काेरोनाच्या भीतीने लोक घरातच थांबणे पसंत करत आहे.

कोरोनाचा राज्यात एकही रुग्ण नाही


कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.


समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राइमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळला नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी कोरोनासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.  

महाराष्ट्रातील सर्व बंदरांवर येणाऱ्या जहाजांमधील प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्रत्येकाला स्वघोषणापत्र देणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यात प्रवाशाने कुठल्या देशातून प्रवास केला व कुठे जाणार आहे, संपर्क क्रमांक आदी माहिती देणे गरजेचे आहे, असे टोपे यांनी सांगितले. कोरोनाच्या सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. नागरिकांनी खोकताना, शिंकताना नाकातोंडावर रुमाल ठेवावा.