आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती-मोदी यांचे होळी सोहळे रद्द; शाळांमध्येही सभा न घेण्याचे आदेश, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा २९ वर पोहोचला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३ रुग्ण आजारातून मुक्त झाले; रुग्णांत १५ जण इटलीचे पर्यटक
  • इटलीचे पर्यटक व्हिएन्ना होत भारतात आले, स्क्रीनिंग होऊ शकली नाही

नवी दिल्ली- ७७  देशांना विळखा घातलेल्या कोरोना व्हायरसने आता भारताला धडकी भरवली आहे. बुधवारी भारतातील रुग्णांचा आकडा थेट २९ वर गेला. केरळ वगळता सर्व २६ प्रकरणे केवळ ७२ तासांत समोर आली आहेत. नव्या रुग्णांत भारतात इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांचा भारतीय वाहनचालकही आजारी आहे. इटलीचे पर्यटक व्हिएन्नामार्गे भारतात आल्यामुळे त्यांचे स्क्रीनिंग होऊ शकले नव्हते. पेटीएमच्या एका कर्मचाऱ्यालाही संसर्ग झाला आहे. यामुळे पेटीएमने गुरगावचे कार्यालय काही दिवसांसाठी बंद केले आहे. 

कोरोनाच्या धोक्याकडे बघता राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा व दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी होळी सोहळ्यांत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. नड्डांनी सर्व प्रदेशाध्यक्षांनाही असे सोहळे टाळण्याचे आवाहन केले. सरकारने शाळांत होणाऱ्या सर्व प्रकारच्या सभा बंद करण्याचे निर्देश सीबीएसईला दिले आहेत. 


भारताची सज्जता... सर्व विमानतळांवर ५०० थर्मल स्कॅनर, ६ लाख स्क्रीनिंग 
-स्क्रीनिंगसाठी विमानतळांवर ५०० थर्मल स्कॅनर लावले आहेत. विमानतळावर ६ लाख, बंदरांवर १५ हजार व नेपाळच्या सीमेजवळील राज्यांत १० लाख लोकांची स्कॅनिंग करण्यात आली आहे. 


-सरकारने ५ लाख मास्क व २ लाख पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट खरेदी करण्याची तयारी केली आहे. राज्यांनाही मास्क खरेदीस सांगितले आहे.


- ४ वैज्ञानिक इराणला पाठवले आहेत. ते तेथे आपली लॅब उभारून भारतीयांची तपासणी करतील. इथे १२०० भारतीय अडकले आहेत. 


- देशभरात ३४ लॅब उभारल्या आहेत. १९ लॅबमध्ये गुरुवारपासून तपासणी सुरू होईल. नोएडानंतर सिकंदराबादेत काही शाळा बंद केल्या आहेत. 


डब्ल्यूएचओचे सरचिटणीस टेद्रोस गेब्रेयासिस यांनी बुधवारी सांगितले की, जगभरात कोरोना व्हायरसचा मृत्युदर ३.४% वर गेला आहे. म्हणजेच संसर्ग झालेल्या १००० रुग्णांपैकी ३४ जणांचा मृत्यू होत आहे. 

मास्कऐवजी स्वच्छ रुमाल वापरा : आरोग्यमंत्री टोपे

प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राइमला दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 


कोणत्या वयात किती धोका?
वयोगट           मृत्यू (%)
0-9                  0.2%
10-29              0.4%
30-49              2.0%
50-69              10%
70 पेक्षा जास्त   14%

बरसाना येथील लठमार होळीत व्हायरसची भीती झुगारली; २ लाखांचा जमाव, शेकडो परदेशी पर्यटक


एकीकडे होळीच्या सोहळ्यांचे आयोजन रद्द होत असताना दुसरीकडे ब्रजमध्ये होळीसाठी प्रचंड गर्दी जमत आहे. मथुरा जिल्हा प्रशासनानुसार, बुधवारी बरसाना येथील ल‌ठमार होळीत २ लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले. यात शेकडो परदेशी पर्यटकांचा समावेश होता. 

एलआयसीचे स्पष्टीकरण; कोरोनातही पॉलिसी कव्हर

कोरोनाग्रस्तांना हेल्थ/टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ मिळणार नसल्याचे म्हटले जात होते. एलआयसीचे वरिष्ठ बिझनेस असोसिएट बलबीर सिंह म्हणाले, पॉलिसीत कोरोना आजारही कव्हर केला आहे.