आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात दहा कोरोनाग्रस्त, अमेरिकेतून आलेला प्रवासी निघाला पाॅझिटिव्ह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या पुणे विमानतळावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा शुकशुकाट होता. - Divya Marathi
नेहमी प्रवाशांनी गजबजलेल्या पुणे विमानतळावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा शुकशुकाट होता.
  • दुबईहून १२९ जणांना घेऊन विमान पुण्यात
  • परिसरातील आठ हजार ७७७ घरांची तपासणी सुरू
  • मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

पुणे - काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुण्यात वाढताना दिसत असून दुबईवरून आलेल्या सात प्रवाशांसह अमेरिकेतून आलेल्या दाेन जणांना काेराेना राेगाची लागण झाल्याचे वैद्यकीय चाचण्यांवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय मुंबई विमानतळावरून पुण्यात प्रवासी घेऊन आलेल्या चालकालाही काेराेनाची लागण झाली असून त्याशिवाय अन्य नवीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. पुण्यातील काेराेना रुग्णांची संख्या दहावर गेली आहे. काेराेना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या आजूबाजूच्या तीन किलाेमीटर परिसरातील सुमारे आठ हजार ७७७ घरांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी सुरू करण्यात आली आहे. यापैकी ३,२८७ घरांची तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी दाेन जणांना काही लक्षणे आढळून आल्याने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. म्हैसेकर म्हणाले, एकूण ३११ जणांना काेराेना संशयावरून निगराणीखाली ठेवण्यात आले असून त्यांना विलगीकरण कक्षामार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत ६६१ परदेशी प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २३७ जणांची वैद्यकीय नमुने घेण्यात आले. त्यापैकी २०५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून अद्याप ३३ जण दवाखान्यात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच २३३ जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली असून त्यातील त्यापैकी दहा काेराेना पाॅझिटिव्ह मिळालेले असून २०४ जणांना घरी साेडण्यात आले आहे. काेराेना माेहीम हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकूण तीन हजार ४४० परदेशी प्रवास केलेल्या प्रवाशांची तपासणी केली आहे.  ५०० रुग्ण विलगीकरण विभागात ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली असून त्यापैकी ३७० बेडची व्यवस्था पुणे शहरात, तर १४० बेडची व्यवस्था पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आली आहे. जे काेराेना रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या घराच्या परिसरातील सर्वेक्षण जीपीएसच्या मदतीने करण्यात येत आहे. त्यानुसार नेमके किती वाॅर्ड या भागात असणे गरजेचे आहे, आराेग्य सुविधांची काय परिस्थिती आहे, आराेग्य कर्मचारी संख्या किती आहे, बायाेडिस्पाेजल व्यवस्था कशा प्रकारे आहे याबाबत आराखडा करून काळजी घेण्यात येत आहे.

पुणे विभागात चार जिल्ह्यांत रुग्ण नाही : 

विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले की, पुणे विभागात सातारा, सांगली, साेलापूर, काेल्हापूर या चार जिल्ह्यांत परिस्थिती नियंत्रणात असून काेणताही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. संबंधित जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बाेलणे केले असून आवश्यक खबरदारी घेण्याचे सूचना दिल्या आहे. काेल्हापुरात ४४, सांगलीत सहा, साताऱ्यात नऊ व साेलापुरात सात परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्ती असून त्यांचा माग वैद्यकीय अधिकारी ठेवत आहेत.दुबईहून १२९ जणांना घेऊन विमान पुण्यात

दुबईहून १२९ जणांना घेऊन स्पाइसजेटचे विमान शुक्रवारी पहाटे पुणे विमानतळावर पोहाेचले. यात ७४  पुरुष, ४१ महिला, १० लहान मुले आणि चार लहान बाळे असे एकूण १२९ प्रवासी आहेत. यात ११८ भारतीय नागरिक असून ११ परदेशी नागरिक आहेत. पुणे विमानतळावर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये कोविड-१९ संदर्भात संशयित रुग्ण कोणीही आढळून आलेले नाहीत. १५ फेब्रुवारी २०२० नंतर आजमितीपर्यंत चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन व जर्मनीतून प्रवास करून आलेले यातील कोणीही नाहीत. दरम्यान, दोन भारतीय नागरिकांपैकी एक महिला (२६) आणि तिचे लहान बाळ (१ वर्ष) यांनी स्वतःहून आजारी (कफ)असल्याचे नमूद केल्याने त्यांना नायडू हॉस्पिटल, पुणे येथे पाठवण्यात आलेले आहे. उर्वरित सर्व प्रवाशांना त्यांच्या घरी विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई 


मास्क, सॅनिटायझरची जादा दराने विक्री तसेच साठवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. चढ्या दराने मास्क विक्री व गुणवत्ताहीन सॅनिटायझर विक्री केल्याप्रकरणी चार दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायझरचा काळाबाजार केल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिला.कोरोनामुळे चंद्रपूरची महाकाली यात्रा रद्द

नागपूर । येथील महाकाली देवीच्या यात्रेला येत्या ३० मार्चपासून सुरुवात होणार होती, पण सध्या असलेला करोना विषाणूचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...