आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील १० जणांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह; आरोग्य विभाग सतर्क

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य विभागाने तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते स्वॅब नमुने
  • लातूर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
  • बीडच्या तिघांनी कोराेना बाधित प्रवाशांसोबत केला होता विमानात प्रवास

बीड - दुबईला पर्यटनासाठी जाऊन आल्यानंतर कोराेनाने बाधित झालेल्या पुण्याच्या प्रवाशांसोबत एकाच विमानात सहप्रवासी असलेल्या बीडच्या एकाच कुटुंबातील तिघांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट शनिवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित एकही रुग्ण नसून नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी केले आहे.राज्यातील काही नागरिक पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. १ मार्च रोजी सर्वजण विमानाने मुंबईत आले. दरम्यान, यापैकी पुण्याच्या एकाच कुटुंबातील तिघांना सुरुवातीला कोरोनाची बाधा झाली त्यानंतर त्याच विमानात असलेले अहमदनगर व यवतमाळ येथील काही जणांना कोरोना झाला. बीडच्या एकाच कुटुुंबातील तिघांनी या विमानात प्रवास केला होता. त्यांचे थुंकीचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले गेले होते. शनिवारी याबाबतचा रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तिघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही त्यांच्यावर २८ मार्चपर्यंत आरोग्य विभाग लक्ष ठेवून असणार आहे. तिघांची प्रकृती ठणठणीत

या तिघांचीही प्रकृती ठणठणीत अाहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात अद्याप एकही संशयित रुग्ण नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. 
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड 
 

लातूर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
लातूर | पुण्यातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या संपर्कात असतानाही तेथे चाचणी होईल या भीतीपोटी लातूरला पळून आलेल्या तिघांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या चौघांना अशा सात संशयित रुग्णांना नाट्यमय पद्धतीने बुधवारी रात्री लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या सातही संशयित रुग्णांचे कोरोना तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पुण्यातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या घरी कामासाठी राहण्याऱ्या दांपत्याने आपली तपासणी होईल आणि आपण अडकून पडू या भीतीपोटी तेथून पळ काढून लातूर जिल्ह्यातील मूळ गाव गाठले होते. त्यावर पुणे जिल्हा प्रशासनाने उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा प्रशासनाला अलर्ट केले होते. लातूर पोलिसांनी त्या तिघांचा शोध लावून त्यांना स्थानिक नातेवाइकांसह लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यांचे स्वॅब नमुने काढून पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.सर्वांनीच मास्क लावण्याची गरज नाही 

दरम्यान, लातूरच्या बाजारपेठेत साधे मास्क आणि सॅनिटायझरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून दुकानांमधून त्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने एक प्रसिद्धिपत्रक जारी केले असून त्यामध्ये सर्वच नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे.हिंगोली : कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आढळले; शासकीय रुग्णालयात दाखल


हिंगोली शहरात कोरोनाचे दोन संशयित रुग्ण शनिवारी ता. १४ आढळून आले असून त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने हिंगोलीतही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, प्रभारी सीईओ धनंजय माळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांंच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांकडून जागृती केली जात आहे. तसेच, आरोग्य विभागाकडून उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. एन. डी. करवा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी घसादुखी, ताप, सर्दीचे दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना विशेष वॉर्डमधे दाखल करून घेतले आहे. यापैकी एक जण दोन दिवसांपूर्वीच पुणे येथून हिंगोलीत आला आहे. तर, एक जण दुबई येथून आला आहे. तुळजापूर : तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रेबद्दल बुधवारी निर्णय


कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चैत्र पाैर्णिमा यात्रेचा फैसला बुधवारी (दि.१८) होणार आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चैत्र पाैर्णिमा यात्रेच्या तयारीसंदर्भात बैठक बोलावण्यात आली असून, कोराेनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून यात्रेबद्दल कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडे लक्ष लागले आहे.जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी निर्माण होईल, अशा जत्रा, यात्रासह समारंभ, कार्यक्रम रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उरुसासह,येरमाळा यात्रा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेची चैत्र पाैर्णिमा यात्रा होणार का, याचा बुधवारी (दि.१८) नवीन प्रशासकीय इमारतीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.गर्दीवर परिणाम नाही

देशभरातील पर्यटनस्थळे तसेच धार्मिक स्थळांवरील गर्दी अोसरत असताना तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मात्र अद्याप कुठलाही परिणाम झालेला नाही. मंदिरात दर्शनासाठी गर्दी कायम असून, सुट्यांमुळे त्यात वाढ होत आहे.नांदेड : माहूरगडावरील गर्दी ओसरली, चैत्र उत्सव साधेपणाने साजरा होणार


नांदेड - आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ म्हणून प्रख्यात असलेल्या माहूर येथील रेणुकागडावर येणाऱ्या भाविकांमध्ये कोरोनाच्या धास्तीने मोठी घट झाली. राज्यातूनच नव्हे तर शेजारी राज्यातील भाविकही मोठ्या संख्येने माहूर येथे देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात. त्यात पर्यटकांचाही काही प्रमाणात समावेश असतो. परंतु मागील आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या धास्तीमुळे श्री रेणुकामाता मंदिरासह अन्य सर्वच मंदिरांत भाविकांची अत्यल्प गर्दी आहे. कोरोनाच्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून राज्यातील अन्य देवस्थानांनी मार्गदर्शनपर पोस्टर /होर्डिंग्ज जागोजागी लावले. दर दोन तासांनी भाविकांची रांग लावण्याच्या कठड्यासह फरशीचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.बीड : जिल्ह्यात इज्तेमा, यात्रा, आठवडी बाजार रद्द


कोरोना व्हायरसमुळे बीड शहरातील बार्शी रोडवर येत्या २६ व २७ मार्च रोजी दोनदिवसीय आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय इज्तेमा पुढे ढकलण्याचा निर्णय जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी एकमुखाने घेतला. आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील सैलानी बाबा यात्रा उत्सवही यंदा रद्द करण्यात आला. आष्टीत रविवारी होणारा आठवडी बाजारही रद्द करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता विटकर यांनी दिली आहे.लातूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यक्रम रद्द


 भाजपचे जिल्ह्यातील आगामी कार्यक्रम, बैठका, मेळावे तूर्त रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी दिली. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी कोरोना आजाराबाबत जनजागृती करावी, असे अावाहन कराड यांनी केले आहे. कराड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या आजाराची घसा तीव्रपणे दुखणे, खोकला, ताप, डोकेदुखी, उलटया व जुलाब आदी लक्षणे आढळून येताच संबंधितावर उपचार करण्यासाठी योग्य ती मदत करावी.बातम्या आणखी आहेत...