आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात आढळले कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण, मुंबईतील स्पेशल वार्डमध्ये सुरू आहेत चाचण्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चीन आणि आशियात थैमान माजलेल्या कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण मुंबईत सापडले आहेत. या दोन्ही व्यक्ती चीन दौरा करून नुकतेच परतले. चीनमध्येच या व्हायरसचा सर्वात घातक प्रादुर्भाव असल्याने त्यांच्यावर काही प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या. तेव्हापासूनच त्यांना स्पेशल वार्डमध्ये अतिदक्षतेखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

संशयित रुग्णांसाठी स्पेशल वार्ड तयार


चीनमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव पाहता, मुंबईत सुद्धा संशयित रुग्णांसाठी एक विशेष वार्ड तयार करण्यात आले आहे. चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात हे वार्ड तयार करण्यात आले. दोन्ही संशयित रुग्णांना पुढील चाचण्या आणि उपचारासाठी याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. बीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा कासकर यांनी ही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. कासकर यांनी सांगितल्याप्रमाणे, चीनहून परतलेल्या दोन व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणे आढळून आली होती. त्यांना सादा खोकला आणि सर्दीनंतर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात सविस्तर चाचण्या घेऊन लवकरच माहिती जारी केली जाणार आहे.

खासगी डॉक्टरांनाही सतर्क राहण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनवरून येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. आरोग्य तपासणीमध्ये काहीही संशयित आढळल्यास त्यांना विशेष वार्डमध्ये दाखल केले जाईल. सोबतच, सरकारी रुग्णालयांसह खासगी डॉक्टरांना सुद्धा सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठल्याही डॉक्टरला चीनवरून परतलेल्या आपल्या रुग्णामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी बीएमसीशी संपर्क साधावा.

ही आहेत कोरोना व्हायरसची लक्षणे

कस्तुरबा रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना राज्य सरकारकडून कोरोना व्हायरस संदर्भात आधीच अलर्ट जारी करण्यात आला. यामध्ये डॉक्टरांना सविस्तर माहिती आणि प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. कोरोना व्हायरसमध्ये सर्दी आणि खोकला ही प्राथमिक लक्षणे आहेत. पुढे जाऊन रुग्णाची परिस्थिती आणखी विकट होऊ शकते. परंतु, चीनमध्ये फोफावलेल्या कोरोना व्हायरसची लक्षणे नवीन आहेत. यामध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यात अडथळा इत्यादींचा समावेश आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.