• Home
  • National
  • Cororna Impact : China's drug supply stops, stocks in India up to April; This makes it possible to ban exports

कोरोनाचा परिणाम / चीनचा औषध पुरवठा थांबला, भारतात एप्रिलपर्यंतचा साठा; यामुळे निर्यातबंदी शक्य

८०% कच्चा माल (एपीआय)चीनमधून येतो, भारताकडून १.३ लाख कोटी रु.ची औषधी निर्यात

दिव्य मराठी

Feb 13,2020 09:43:00 AM IST

पवनकुमार

नवी दिल्ली - चीनमध्ये फैलावलेल्या कोराेना व्हायरसमुळे भारतात औषधींची समस्या उभी राहू शकते. भारताकडे एप्रिलपर्यंतचा औषधींचा साठा आहे. औषधांच्या किमती वाढू नयेत याच्या नियोजनासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यात ८ महत्त्वाच्या तांत्रिक विभागांतील तज्ञांचा समावेश करण्यात आला अाहे. समितीने याचा प्राथमिक अहवालही सरकारकडे दिला आहे. पुढील एका महिन्यात चीनकडून औषधांचा पुरवठा न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
भारतात चीनकडून ८०% एपीआय (औषधी तयार करण्याचा कच्चा माल) येतो. चीनकडून ५७ प्रकारचे मॉलिक्युल्स येतात. १९ प्रकारच्या कच्च्या मालासाठी भारत चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये जानेवारीत सुट्या असतात. यासाठी कच्चा माल कमी आला. यानंतर व्हायरस पसरला आणि चीनमध्ये औषधींचे उत्पादन तत्काळ थांबवण्यात आले.


यामुळे पुरवठा गेल्या एक महिन्यांपासून ठप्प झाला आहे. तेथे परिस्थिती सामान्य झाल्यानंतर उद्योग सुरू होतील. त्यानंतर समुद्रमार्गे भारतात औषधे पोहोचण्यास कमीत कमी २० दिवस लागतात. ही परिस्थिती पाहता, उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले, सरकार औषधांच्या निर्यातीवर बंदी आणू शकते. भारतात वेगवेगळ्या देशांतून दरवर्षी १.३ लाख कोटी रुपयांची औषधी निर्यात होते.


देशात एकूण अडीच लाख कोटी रुपयांचा औषधी व्यवसाय आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जर चीनमध्ये परिस्थितीत सुधारणा न झाल्यास भारतात अँटिबायोटिक्स, अँटी डायबिटिक, स्टेरॉइड, हार्मोन्स व व्हिटॅमिन्सच्या औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. भारतातच नव्हे इतर देशांतही चीनकडून कच्चा माल मागवला जातो.

व्हायरसच्या संशयाने आंध्रात एकाची आत्महत्या


हैदराबाद - आंध्र प्रदेशात कोरोना व्हायरसच्या संशयामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली. त्याला सर्दी-पडसे व ताप आला होता. हे प्रकरण चित्तूरमधील अाहे. बालाकृष्ण नावाच्या व्यक्तीला डॉक्टरांनी मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता. बालाकृष्णाला टीबी असावा, असा डॉक्टरांचा कयास होता. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले, रुग्णालयातून परतल्यानंतर कोरोना व्हायरसच्या बातम्या ते पाहात होते. त्यामुळे आपल्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असावा, असा संशय निर्माण झाला. माझ्यामुळे इतर सदस्यांना कोरोना व्हायरस होईल, या भीतीने त्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर डाॅक्टरांनी सांगितले, सर्दी-पडसे -ताप हे सामान्य आजार आहेत. बालाकृष्णा यास कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

X