विधान परिषदेत खुलासा / जलयुक्त शिवारच्या कामांत भ्रष्टाचार, जलसंधारण मंत्र्यांनीच दिली कबुली, एसीबी चौकशीची विरोधकांची मागणी

एसीबी चौकशीची विरोधकांची मागणी, प्रश्न राखून ठेवला

विशेष प्रतिनिधी

Jun 25,2019 09:39:41 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची फ्लॅगशिप योजना असलेल्या व राज्यातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता आढळून आली आहे, अशी कबुली चक्क जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. दरम्यान, या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एसीबी चौकशीची मागणी लावून धरत जलसंधारण मंत्र्यांना धारेवर धरले. मंत्र्यांच्या उत्तराने गोंधळ झाल्याने सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवला.


राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न सोमवारी विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. त्यावर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली दिली. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबतचा मूळ प्रश्न होता. त्यात या कामात गैरव्यवहार झाल्याचे विभागाने मान्य केले. तसेच या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुप्त चौकशी केली असल्याची कबुली मंत्र्यांनी दिली. जलयुक्तच्या १ हजार ३०० कामांच्या विभागीय चौकशा सुरू असल्याचे सांगत याबाबतचा तांत्रिक अहवाल आल्यावर या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी करायची किंवा नाही याचा निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.


पहिल्याच उत्तरात विकेट
तानाजी सावंत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री झाले. सावंत यांचे पदभार सांभाळल्यानंतर वरिष्ठ सभागृहातील सविस्तर असे हे पहिलेच उत्तर होते. मात्र त्यांना या प्रश्नाला कुशलतेने तोंड देता आले नाही. त्यांच्या उत्तरावर मंत्री आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. सरकारी अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरणाचा अधिकार सभागृहाला नाही, असा शेरा सावंतांनी उत्तरात मारला. त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच सावंत यांचे सदर विधान कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले. प्रश्नसुद्धा राखून ठेवला.

जलयुक्तचे थर्ड पार्टी ऑडिट करा : मुंडे
राज्यात जलयुक्तच्या हजारो कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे सरकार या संपूर्ण जलयुक्त अभियानाचे थर्ड पार्टी ऑडिट करणार काय, असा सवाल करत सरकार भ्रष्टाचाराला, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उघड चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. यावर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराला धनंजय मुंडे यांच्यासह आमदार हेमंत टकले, आमदार सतीश चव्हाण, आमदार भाई जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने मंत्र्यांना आपले विधान मागे घ्यावे लागले. तसेच सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवत असल्याचे जाहीर केले.

पुढील आठवड्यात अहवाल आल्यानंतर चौकशीचा निर्णय घेऊ : मंत्र्यांकडून आश्वासन
आतापर्यंत चार कामांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित कामांचा अहवाल पुढील आठवड्यात येईल. त्यानंतरच आवश्यकता भासल्यास एसीबी अथवा पोलिसांमार्फत खुली चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सावंत यांनी सांगितले. विरोधकांनी एसीबी चौकशीची आग्रही मागणी केली. एसीबीला तांत्रिक बाजू समजणार नाही म्हणून विभागीय चौकशी करण्यात आली. तांत्रिक अहवालापूर्वी कारवाईचे आदेश दिल्यास कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होईल, असा दावा सावंत यांनी केला.

X
COMMENT