आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणी-नाेकरशाही यांच्यातील अभद्र युतीने भ्रष्टाचाराला बळकटी : लक्ष्मीकांत देशमुख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राजकारण व नाेकरशाहीतील अभद्र युतीने भ्रष्टाचाराला बळकटी मिळत असून या व्यवस्थेत तत्वनिष्ठतेने काम करणारा प्रशासकवर्ग दुर्दैवाने दुर्मिळ हाेत चालला अाहे. अशा साहसी, हिंमतवान अाणि जिगरबाज अधिकाऱ्यांना प्राेत्साहन देणारी अाणि  भारतीय प्रशासन व्यवस्थेवर अचूक भाष्य करणारी प्रभावी कादंबरी म्हणून अभिजीत कुलकर्णी लिखित ‘रेड टेप’कडे बघायला हवे, असे गाैरवाेद्गार अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले. 


गंगापूर राेडवरील कुसुमाग्रज स्मारकात मेहता पब्लिकेशनच्या रेड टेप कादंबरीचे प्रकाशन करण्यात अाले. या कादंबरीचे सूत्र अाकर्षक अाणि भारतीय माणसांना पटणारे असल्याचे सांगत देशमुख म्हणाले की, एका जिल्हाधिकाऱ्याचा संघर्ष ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी एडीटर अभिजीत कुलकर्णी यांनी चपखलपणे शब्दबद्ध केला अाहे. ही कादंबरी संभाषणातून उलगडत जाते. अशा प्रकारचे लेखन किती अवघड असते याची मला जाणीव अाहे. यातील घटना पात्रांच्या परस्पर संबंधातून अाणि त्यांच्या संवादातून उलगडत जातात. कादंबरीतील अधिकारी संघर्षाअंती यशस्वी हाेत असला तरी प्रत्यक्षात दहापैकी नऊ अधिकारी अशा संघर्षात अपयशीच हाेतात हे कटू सत्य अाहे. प्रकरणे शांत करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे वा अन्यत्र पदाेन्नतीच्या अाडून पदावनतीला शाेभेल असे काम देणे या बाबी सुन्न करणाऱ्या असतात. यातून राजकीय ऱ्हासाचे दर्शन प्रकर्षाने हाेते. व्यवस्थेचा बारकाईने अभ्यास अाणि निरीक्षण करून ही कादंबरी लिहिली अाहे. अरुण साधू अाणि मधू मंगेश कर्णिक यांच्या पावलावर पाऊल ठेवून लेखकाने प्रशासकीय व्यवस्थेवर भाष्य करणारे साहित्य लेखन यापुढेही करत रहावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.


‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित म्हणाले, ‘रेड टेप कादंबरीतील घटना प्रशासकीय अधिकारी, मंत्री, त्यांचे समर्थक, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या परस्पर संबंधातून उलगडत जातात. त्यातून प्रशासनाच्या चाैकटीचे, भ्रष्टाचाराचे, प्रशासन व सरकार यांच्या परस्पर संबंधाचे चित्र उलगडत जाते.’ मेहता पब्लिशिंग हाऊसचे सल्लागार अनिल मेहता म्हणाले की, समकालीन वास्तवाचे वेगवेगळे पैलू तितक्याच परखडपणे मांडण्यात आल्याने रेड टेप या कादंबरीतून सद्यस्थितीविषयीचे चित्र समोर उभे होण्यास मदत होते. या पुस्तकाचा चाहता म्हणून मी खास करून या प्रकाशन समारंभाला अालाे अाहे. अभिजीत कुलकर्णी यांनी सांगितले की, बातमी वा भाष्य लेखन अाणि साहित्य निर्मिती यात किती माेठा फरक असताे हे मला कादंबरी लिहिताना लक्षात अाले. पत्रकार म्हणून काम केल्यानंतर शासनाच्या माहिती विभागात सहाय्यक संचालक म्हणून काम करताना सरकारी व्यवस्थेची अातली बाजू बघायला मिळाली. शासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकारणी अाणि अभ्यागत यांचे निरीक्षण करण्याचा पुरेसा अवधी याच काळात मिळाला. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी टिझर निर्मिती करणारे सचिन शिंदे, प्रशांत साठे व लक्ष्मण काेकणे यांचा सत्कार करण्यात अाला. पीयूष नाशिककर यांनी सूत्रसंचालन केले. दीप्ती राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

बातम्या आणखी आहेत...