आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाचा खर्च एकरी ३८ हजार; उत्पन्न केवळ साडेबारा हजार; हजारो शेतकऱ्यांना मोठा फटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुकाणे- उन्हाळ्यात अहोरात्र कष्ट करत जगवलेले उसाचे पीक ऐन पावसाळयात हुमणीने गिळंकृत केले. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून नेला. उभे पीक आडवे झाले. उसाची चिपाडे झाली. जनावरांसाठी चारा म्हणून ऊस विकण्याशिवाय कोणताच पर्याय राहिला नाही. लाखाचे बारा हजार कसे होतात, याचा प्रत्यय हुमणीने दिला. आता कृषी सल्लागारांची नव्हे, तर नुकसानीच्या पंचनाम्यांची गरज असल्याचा सूर ऊस उत्पादकांत अाहे. सरकारी पातळीवर मात्र हुमणीबाधित क्षेत्राकडे कानाडोळा केला जात आहे. 


भेंडे शिवारातील अर्जुन खराडे यांनी त्यांच्या पाच एकर ऊस पिकावर हुमणीने आणलेल्या संकटाची माहिती डोळे भरून सांगितली. हुमणीची लक्षणे दिसू लागताच प्रतिबंधक औषधे पाण्यातून सोडली, पण या किडीने दाद दिली नाही. आता पीक डोळ्यादेखत उद््ध्वस्त होत आहे. धडधडत्या काळजाने ते जनावरांच्या चाऱ्यासाठी पाचशे रुपये टनाने विकावे लागले. नांगरट, हारू, सरी पाडणे, बेणे, लागवड मजुरी, दोनदा खुरपणी, रासायनिक खते, तणनाशके असा एकरी खर्च ३८ हजार झाला आणि पाचशे रुपये टनाप्रमाणे चारा म्हणून ऊस विकावा लागला. एकरी २५ टनाप्रमाणे १२ हजार ५०० हाती आले. सहकारी संस्था, बँकेकडून घेतलेले कर्ज फिटण्याऐवजी कर्जबाजारी होण्याची वेळ हुमणीच्या संकटाने आणली. पाच एकरांतील ३ एकर ऊस चारा म्हणून विकला. उर्वरित दोन एकर घरच्या जनावरांना चारा म्हणून घालत आहे, असे त्यांनी सांगितले. 


गेल्या वर्षी एकरी ८० टन उत्पादन खराडे यांना मिळाले होते. विहिरीत पाणी आहे, पण पीकच जमीनदोस्त झाले. हुमणीच्या संकटाने बाधित क्षेत्राचे आता पंचनामेच आवश्यक अाहेत. साखर कारखान्यांचे प्रत्यक्ष गाळप सुरू होण्यास महिन्यापेक्षाही अधिक कालावधी आहे. ज्ञानेश्वर, मुळाच्या कार्यक्षेत्रातील ४० टक्के क्षेत्र हुमणीबाधित झाले आहे. उर्वरित क्षेत्रावरही हुमणीची लक्षणे दिसत अाहेत. यंदा उत्पादन व सरासरी उताराही हुमणीच्या संकटाने घटणार आहे. नेवासे तालुक्यात ५० टक्के उसावर हुमणीची बाधा झाली आहे.

 
जिल्ह्यात हुमणीच्या संकटाची चाहूल दैनिक दिव्य मराठीने सर्वप्रथम ऊस उत्पादकांसमोर आणल्यावर कृषी विभाग खडबडून जागा झाला. पण हुमणीने पिकांचा घास पूर्णपणे घेतल्याने कृषी विभागाच्या सल्ल्याचा फारसा उपयोग झाला नाही. खराडे यांच्यासारखीच इतर उसउत्पादकांची व्यथा आहे. हजारो एकरांतील हजारो शेतकरी हुमणीने संकटात आले आहेत. आता पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याशिवाय कोणताच पर्याय नसताना सरकारी पातळीवर मात्र याकडे कानाडोळा केला जात आहे. 


मंत्री चंद्रकांत पाटील यांना याविषयी निवेदन दिले आहे. हुमणीबाधित ऊसशेतीचे पंचनामे करण्याची मागणी या निवेदनात केली आहे, असे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सांगितले. 


हुमणीबाधित क्षेत्रात वाढ 
 हुमणीच्या संकटाची सर्वप्रथम दखल घेत ऊस उत्पादकांसाठी आवाज उठवला. हुमणीबाधित क्षेत्रात वाढच होत आहे. प्रतिबंधक औषधेही दाद देत नसल्याने ऊसउत्पादक हतबल झाले आहेत. आता पंचनामे करून सरकारी यंत्रणेने नुकसान भरपाई द्यावी. 
- शंकरराव गडाख, माजी अध्यक्ष, मुळा साखर कारखाना, सोनई, ता. नेवासे. 

 

नुकसान भरपाई मिळावी 
हुमणीबाधित उसाचे क्षेत्र नेवाशाप्रमाणेच शेवगाव तालुक्यातही मोठे आहे. या वेळी सर्वाधिक उसाचे नुकसान या किडीने केले आहे. कापसावरील बोंडअळीप्रमाणे हुमणीबाधित उसाच्या क्षेत्राचेही पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. चंद्रशेखर घुले, अध्यक्ष, ज्ञानेश्वर कारखाना, भेंडे. 

बातम्या आणखी आहेत...