आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संदीप दाभाडे
जालना - अति पावसामुळे सोयाबीन हाताचे गेले. कापूसही काळवंडला. त्यामुळे त्याला प्रतिक्विंटल केवळ ३२०० रुपयांचा भाव आणि प्रती किलो १० रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नाही. अतिपावसाने कापसाची बोंडे तुटून पडली. उरलेल्या कपाशीची डुकरांनी नासाडी केली. त्यामुळे तीन एकर कपाशीवर नांगर फिरवला. रबी हंगामासाठी शेतात पाण्याची व्यवस्था नाही, पैसे नाही. दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, या विचाराने मनात आत्महत्येचे विचार येताहेत, मात्र कुटुंबाकडे बघून स्वत:ला सावरतोय, अशी व्यथा घनसावंगी तालुक्यातील जामतांडा येथील शेतकरी प्रकाश राठोड यांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडली.
पांडे पोखरी परिसरात राठोड यांची पाच एकर शेती आहे. त्यांनी दोन एकरात सोयाबीन, तीन एकरांत कपाशी आणि तूर लावली. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळेे हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हातून गेले. पावासाने कापूस काळवंडला. चांगल्या कापसाला ४५०० ते ५००० रुपयांचा भाव आहे.मात्र अती पावसामुळे काळवंडलेल्या कापसाला प्रति क्विंटल ३२०० रुपये भाव आहे. अती पावसामुळे कापूस गळाला, बोंडे तुटली.हरिण आणि डुकरांनी देखील कापसाची नासाडी केल्यामुळे कमी कापूस वेचणे मजुरांना परवडत नाही.काही मजूर ऊस तोडणीला गेले तर काही जात आहे. म्हणून कापूस वेचायला ८ ते १० रुपये प्रति किलो मजुरी देेऊनही मजूर मिळत नाही. त्यामुळे संतापून राठोड यांनी तीन एकर कपाशीवर नांगर फिरवला. दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न राठोड यांना सतावत आहे. काही ठिकाणी तर मजूरही मिळेना. त्यामुळे जांब समर्थ, कुंभार पिंपळगाव, राजा टाकळी, विरेगाव तांडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कपाशी वेचनीवाचून तशीच पडून आहे.
डुकरांनी तारेचे कुंपण उकरले
काही शेतकऱ्यांनी कपाशी, उसाच्या बचावासाठी शेतात तारेचे कुंपण लावले. मात्र डुकरांनी हे तारांचे कुंपणही उकरून पिकांची नासाडी केली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.
नुसता शासकीय पंचनाम्याचा फार्स
मागच्या वर्षी दोन एकर केळीचे पीक घेतले होते. चक्रीवादळामुळे सगळे साफ झाले. तहसीलदार आले आणि पंचनामा करून गेले. त्याची काहीही मदत मिळाली नाही. आमदार येतात येतात पाहणी करतात अन् म्हणतात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मदत तर काहीच मिळत नाही. मग पंचनाम्याचा त्रास तरी कशाला म्हणून मी यंदा सोयाबीनच्या पंचनाम्यासाठी शेतात तलाठ्याला येऊ दिले नाही. दीड एकर ऊस डुकरांनी पूर्ण खुंदाळला आहे. सिंडिकेट बँकेचे २ लाख ९० हजारांचे कर्ज आहे. - दामोदर रंगनाथ तांगडे, शेतकरी, जांब समर्थ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.