आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींच्या श्रद्धांजलीला MIM नगरसेवकाचा विरोध; कायदा हातात घेऊन भाजपकडून बेदम मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद शहरातील लोकांनी मुबलक पाणी, रुंद व चांगले रस्ते, दर्जेदार पथदिवे व ड्रेनेजलाइनसाठीच आपल्याला निवडून दिले आहे याचा विसर दिवसेंदिवस नगरसेवकांना पडत चालला आहे. सभेत कोणत्या विषयावर विरोध करावा याचे भान त्यांना राहिले नाहीच. एखाद्याने विरोध केला तर कायदा हातात घेऊन त्याला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. शुक्रवारी (१७ ऑगस्ट) मनपाच्या सभेत त्याचे प्रत्यंतर आले. 


वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावास एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी कुरापत काढून विरोध केला. एमआयएमच्या इतरांचा प्रस्तावाला पाठिंबा होता. पण त्याकडे दुर्लक्ष करत भाजपचे नगरसेवक त्यांच्यावर चालून गेले. बाकांवर चढून लाथाबुक्क्यांनी त्यांना अमानुष मारहाण केली. यात भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे आघाडीवर होते. ही घटना कळताच दोन्ही बाजूंचे समर्थक मनपा मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. टाऊन हॉल येथे भाजपचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्यासह तीन गाड्यांवर दगडफेक, देशमुख यांच्या वाहनचालकाला मारहाण केली. सुमारे तीन तास सिटी चौक, टाऊन हॉलसह अनेक भागांत तणावाचे वातावरण होते. दरम्यान, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मतीन यांचा विरोध पक्षाची भूमिका नाही, असे सांगत त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली, तर युतीच्या शिष्टमंडळाने मतीनविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सभागृहात त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. मात्र, औरंगाबादकरांसाठी महत्त्वाच्या समांतर जलवाहिनी योजना प्रस्तावावर मिनिटभरही चर्चा झाली नाही. 


समांतर योजना कशी व कुणामार्फत करावी यासाठी शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यामुळे या सभेत केवळ श्रद्धांजली घेण्याचे ठरले. त्यानुसार वाजपेयींच्या जीवनचरित्रावर आधारित २५ मिनिटांची चित्रफीत दाखवण्यात आली. मग राजू वैद्य, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, प्रमोद राठोड, राज वानखेडे, कीर्ती शिंदे, सीमा खरात, शिल्पाराणी वाडकर, राजेंद्र जंजाळ, विकास जैन यांनी मनोगत मांडले. 


आधी एक जण धावून गेला...
तेव्हा मतीन यांनी उभे राहत आम्ही अजूनही बाबरी मशीद पाडल्याचे विसरलाे नाही. त्यामुळे श्रद्धांजली वाहण्यासाठी आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. सुरुवातीलाच दिलीप थोरात मतीन यांच्या अंगावर धावून गेले. तोपर्यंत राठोड यांनी थेट मतीन यांच्या कानशिलात भडकावली. मग सर्वच भाजप नगरसेवकांनी लाथाबुक्क्या व चापटांनी हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी कडे करून मतीन यांना बाहेर नेल्यावर सभा सुरू झाली. त्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासह कायमस्वरूपी सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. या वेळी एमआयएमचा एकही नगरसेवक नव्हता. 


चालकाला मारले...
भाजप संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या चारचाकीवर मतीन समर्थकांनी दगडफेक केली. चालक विलास गोराडे यांना लाथाबुक्क्यांनी मारले. याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


मतीनविरुद्ध धर्म, वंशावरून शत्रुत्व वाढवल्याचा गुन्हा...
मतीन यांच्या विरोधात सायंकाळी सिटी चौक पोलिसांत उपमहापौर विजय औताडे यांनी फिर्याद दिली. मतीन यांनी वाजपेयींविषयी अनुद््गार काढून दोन धर्मांत द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य केले. मनपा कार्यालयाबाहेर जमावाला चिथावणी देऊन धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटलेे. त्यावरून मतीन विरोधात भादंवि कलम १५३, १५३ (अ) (धर्म,वंश,जन्म,निवास भाषा इ. कारणावरून निरनिराळ्या गटांत शत्रुत्व वाढवणे ) व २९४ (सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याला चीड आणणारे अश्लील वक्तव्य, शब्द प्रयोग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक डी. एस. शिंगारे तपास करत आहेत. 


मतीन यांना प्रवेशबंदी...
मतीन यांना सभागृहात प्रवेश देऊ नये, असे पत्र महापौरांनी सुरक्षा अधिकाऱ्याला दिले. शिवाय सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचेही आदेश दिले. यात असभ्य वर्तणुकीसह महिलांना धमकी, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले जाणार आहे. 


यापूर्वीही मतीन यांच्याकडून स्टंट...
यापूर्वी मतीन यांनी कोणतीही मान्यता न घेता मनपाच्या प्रवेशद्वाराला उर्दूचे बोर्ड लावले होते. पाणीप्रश्नावरून सुरक्षा रक्षकांना मारहाण केली होती. ६ जुलै २०१७ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध केला होता. १८ ऑगस्ट २०१७ रोजी 'वंदे मातरम' या गीताला सर्वसाधारण सभा व 'स्थायीत विरोध केला. 


कलम दहा (१) व अनुसूची ड मधील कलम दोननुसार कारवाई...
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे प्रकरण दोनमधील अनुसूची ड मधील कलम दोन आणि कलम दहा (१) अन्वये सभागृहात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. मतीन यांच्यावर कारवाई करणाऱ्या महापौरांनी भाजप नगरसेवकांना संरक्षण दिले. ही बाब निदर्शनास आणून दिली असता मनपा आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. 


दोनसदस्यीय समिती स्थापन...
या प्रकरणाचा अहवाल तयार करून शासनाकडे मतीन यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी काढावे, अशी शिफारस शासनाकडे करण्यात येणार आहे. त्यासाठी विधी सल्लागार अपर्णा थेटे आणि प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. तातडीने अहवाल तयार होणार असल्याचे घोडेले यांनी सांगितले. 


पोलिस आयुक्तालयासह मनपाला छावणीचे स्वरूप 
मनपातील गोंधळाची माहिती सोशल मीडिया, व्हॉट्सअॅपवरून सर्वत्र पसरली. मनपात कार फोडल्याचे छायाचित्र व्हायरल होताच तणाव अधिक वाढला. शंभरावर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तालयासह मनपात गर्दी केली. सिटी चौक ठाण्याच्या आवारात गट जमा झाले. त्यामुळे तिन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही तासांत छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याने पोलिस आयुक्तालयात सर्वांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले होते. 


ज्यांना मारले त्यांनीच मतीन यांना वाचवले 
मतीन यांनी गेल्या वर्षी पाणीपुरवठ्यावरून सभागृहात गोंधळ घालत मनपाच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण केली होती. आज भाजप नगरसेवक मतीन यांना मारत होते तेव्हा त्यांना याच सुरक्षा रक्षकांनी वाचवले. 

 
सात नगरसेवक असूनही मतीनचाच विरोध 
एमआयएमचे जफर शेख, फिरोज खान, जमीर कादरी, गंगाधर ढगे, मतीन सय्यद, जहांगीर खान, अय्युब जहागीरदार व काँग्रेसचे सोहेल शेखही उपस्थित होते. यापैकी केवळ मतीन यांनीच विरोध केला. 


उपमहापौरांनी घातली लाथ 
उपमहापौर औताडेंनी टेबलावर चढून मतीन यांना लाथ घातली. प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, राजगौरव वानखेडे व रामेश्वर भादवे हे मारहाणीत आघाडीवर होते. 


समर्थन नाही, परंतु मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : एमआयएमची मागणी 
दरम्यान, मतीन यांची भूमिका वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. त्यांच्यावर कारवाईचा अहवाल श्रेष्ठींकडे पाठवला जाईल. मात्र, त्यांना मारहाण करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे केली. दरम्यान, मतीनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून एमपीडीएनुसार कारवाई करावी, असे युतीच्या शिष्टमंडळाचे म्हणणे होते. दोन दिवसांनी योग्य तो निर्णय घेऊ, असे म्हणत आयुक्तांनी शिष्टमंडळे माघारी पाठवली. महापौर, उपमहापौर, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांच्यासह इतर पदाधिकारी, नगरसेवक प्रसाद यांच्या भेटीसाठी आले असताना माध्यम प्रतिनिधींनी दालनाबाहेर काढण्यात आले. दरम्यान, मतीन यांचे कृत्य धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला असतानाही सभागृहात त्यांच्या शोकसभेत विरोध करून वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करावे, अशी मागणी केली. या वेळी आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, राजू वानखेडे, प्रमोद राठोड, राजू वैद्य, विकास जैन, राजेंद्र जंजाळ, माधुरी अदवंत, सचिन खैरे, अनिल मकरिये, सचिन झवेरी, ऋषी जैस्वाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती. 


आमदार इम्तियाज जलील यांच्यासह शिष्टमंडळ भेटले 
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार काद्री, अरुण बोर्डे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह पोलिस आयुक्तालयात पोहोचले. मतीन यांना मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. मतीन यांच्या कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही तसेच त्याला नगरसेवकांनी झुंडशाहीने केलेल्या मारहाणीचे समर्थन होऊ शकत नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे नगरसेवक मारहाण करत आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत. पोलिसांनी कडक भूमिका घेतली नाही तर असे प्रकार वाढून तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील, असे ते म्हणाले. 


भाष्य : 'धर्मवीरां'ची असहिष्णुता 
'येनकेनप्रकारेन' प्रसिद्धीच्या झोतात राहायचे, ते करीत असताना मनांचे आणि त्यातून पर्यायाने मतांचे ध्रुवीकरण कसे होईल हे पाहायचे हे ज्यांचे उद्योग झाले आहेत त्यांना वृत्तपत्रात जागा तरी कशाला द्यायची? हा प्रश्न प्रत्येक वेळी पडतो. पण अशा प्रवृत्तींना समाजाने बळी पडू नये यासाठी प्रयत्न करायचे असतील तर त्यांचा उल्लेख टाळताही येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सारा देश ज्यांच्यासाठी हळहळतो आहे त्या माजी पंतप्रधानाला श्रद्धांजली वाहण्याची ज्याची इच्छा नाही त्याने सभागृहात अनुपस्थित राहण्याऐवजी अप्रस्तुत विरोध करून चिथावणीखोर वक्तव्य करायची हा कायद्याच्या भाषेत कदाचित देशद्रोह होणार नाही. पण भावना भडकवून सामाजिक शांतता आणि सलोखा उधळून लावणारा हा समाजद्रोह आहे. एमआयएम पक्षाकडून निवडून आलेल्या मतीन नामक नगरसेवकाने तो समाजद्रोह नक्कीच केला आहे. लोकशाही व्यवस्थेत एखाद्या ठरावाला विरोध नोंदवण्याचा अधिकार प्रत्येक नगरसेवकाला आहे. पण तो अधिकार कसा आणि केव्हा वापरायचा याचे तारतम्य ठेवण्याचे कर्तव्यही नगरसेवकांनी बजावले पाहिजे. या नगरसेवकाने ते तारतम्य गमावले आहे, असे म्हणता येणार नाही. उलट हे तारतम्य केव्हा पाळायचे नाही हे समजण्याइतकी चलाखी त्याच्याकडे आहे, हे त्याने याआधी केलेल्या अशाच प्रकारातून दाखवून दिले आहे. अशा कृतीतून समाजभावना भडकवायच्या, मतांचे ध्रुवीकरण करायचे आणि आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा साधून घ्यायच्या हे डाव त्यामागे आहेत. त्यासाठी समाजात अशांतता निर्माण झाली तरी अशा प्रवृत्तींना ती हवीच असते. त्यामुळे एमआयएमचे इथले नेते आमदार इम्तियाज जलील यांनी त्याला पाठबळ दिलेले नाही हे चांगलेच केले. पण तेवढ्याने भागणार नाही. अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी जे काही अमानवीय आणि असंसदीय कृत्य केले तेही तितकेच निंदनीय आहे. नगरसेवक मतीनसारख्या प्रवृत्तींना दुर्लक्षून संपवण्याचे शहाणपण 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्यांकडे असण्याची अपेक्षा तर दूरच; पण जीवघेणी मारहाण आणि तीही सभागृहासारख्या पवित्र स्थानी करू नये, याचे भानही त्यांनी ठेवू नये. नगरसेवक मतीन जर आपल्या कृतीने आपल्या समाजातील धर्मवेड्या समूहाला संघटित करू इच्छितो असे म्हटले तर भाजपच्या नगरसेवकांनाही आपली 'धर्मवीर' अशीच प्रतिमा समोर आणायची आहे असेच म्हणावे लागेल. अटलजींविषयीच्या त्यांच्या भावना तीव्र असत्या तर त्यांच्या श्रद्धांजली सभेचा असा आखाडा त्यांनी होऊ दिला नसता. त्यामुळे नगरसेवक मतीन जितका दोषी असेल तितकेच भाजपचे नगरसेवकही दोषी आहेत, हे नाकारताच येणार नाही. हे सारे अटलजींसारख्या सहिष्णू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी घडत राहावे, यापेक्षा वाईट काय असू शकते? 
- दीपक पटवे

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS

 

बातम्या आणखी आहेत...