Maharashtra Special / लग्नात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 'बंटी-बबली'ला पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले रंगेहात, त्यांच्याकडून 92 तोळे सोने आणि 5 लाखांच्या रोकडीसह स्विफ्ट कार जप्त

चाेरीच्या पैशांतून पुण्यात घेणार हाेते फ्लॅट, आहेरात मिळाल्या साड्याही

दिव्य मराठी वेब

Jun 21,2019 10:13:34 AM IST

पुणे - गळयात २५ ताेळे साेने व भरजरी साडी नेसलेली महिला व तिच्यासाेबत पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट, जाकिट, महागडा गाॅगल व फेटा घातलेला व्यक्ती एखाद्या लग्न समारंभात कारमधून येत असेल तर ते वधू किंवा वराकडून आलेले वऱ्हाडी असल्याचे वाटेल. मात्र, पुणे जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालयांत अशा प्रकारे नटूनथटून जात साेलापूरच्या एका दांपत्याने माेठ्या प्रमाणात साेन्याचे दागिने व राेकड चाेरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाेलिसांनी आराेपी दांपत्याकडून ९२ ताेळे साेन्याचे दागिने, पाच लाख २७ हजारांची राेकड, दहा माेबाइल व गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ३७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विलास माेहन दगडे (२८) व त्याची पत्नी जयश्री विलास दगडे (२५, रा. खुळेवाडी, चंदननगर, पुणे, मू. रा.शेलगाव वांगी, करमाळा, साेलापूर) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दांपत्याचे नाव आहे. हे जाेडपे गेल्या आठ महिन्यांपासून पुण्यातील चंदननगर भागात वास्तव्यास आहे. विलास दगडे याने सुरुवातीला एका लग्नातून चाेन्याचे दागिने चाेरले. त्यानंतर त्याने पत्नीला साेबत घेत विविध लग्नांत जात वधू कक्षातून साेन्याचे दागिने लंपास करण्यास सुरुवात केली. चाेरीचे दागिने व चाेरलेल्या पैशातून त्यांनी सहा महिन्यांपूर्वी साडेसात लाख रुपये राेख रक्कम देत नवीन काेरी स्विफ्ट डिझायर कार खरेदी केली. त्यानंतर कारमध्ये पती-पत्नी फिरत. त्यांनी सासवड, आेतूर, राजगड, लाेणी काळभाेर, तळेगाव ढमढेरे, शिरूर, केडगाव चाैफुला, वालचंदनगर, भांडगाव, माळेगाव आदी ठिकाणच्या वेगवेगळ्या मंगल कार्यालयांत जाऊन दागिने व राेकड चाेरली. अशा प्रकारे त्यांनी केलेले एकूण १७ गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना माहिती मिळाली हाेती की, मंगल कार्यालयांतील लग्नाच्या गडबडीचा फायदा घेऊन वऱ्हाडी मंडळीचे साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम चाेरी करणारे दांपत्य यवत हद्दीतील समृद्धी मंगल कार्यालयात येणार आहे. त्याप्रमाणे पाेलिसांनी सापळा रचून दाेघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दाेन माेबाइल, ५ लाख २७ हजारांची राेकड, ९२ साेन्याचे दागिने व स्विफ्ट डिझायर कार असा ऐवज जप्त केला.

चाेरीच्या पैशांतून पुण्यात घेणार हाेते फ्लॅट, आहेरात मिळाल्या साड्याही

स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, आराेपी दांपत्याला ११ महिन्यांची मुलगी असून चाेरी करण्यासाठी जात असताना ते मुलीस सासूजवळ घरी ठेवत हाेते. कारने लग्न समारंभात जात.वधूच्या कक्षात सर्व जण वधूच्या मेकअपमध्ये गुंतलेले असल्याने साेन्याच्या दागिन्यांची पर्स पाहून ती महिला आराेपी लंपास करत हाेती. काेणी विचारणा केली तर वधू-वराच्या आेळखीतील असल्याचे सांगत. आरोपी दांपत्य हे आहेरासाठी १०० ते ५०० रुपयांचे पाकीट देत हाेते. ते स्वत:ला पाहुण्े असल्याचे भासवत. त्यामुळे दाेन ते तीन लग्नांत आराेपी महिलेला साड्यादेखील मानापानात मिळाल्या. चाेरीच्या पैशातून त्यांना फ्लॅट घ्यावयाचा असल्याने त्यांनी दागिने साठवून ठेवले हाेते.

X
COMMENT