निष्काळजीपणा / पेस्ट कंट्रोल झाल्यानंतर दारे-खिडक्या बंद करून बसलेल्या दांपत्याचा गुदमरून मृत्यू

  • सकाळी पेस्ट कंट्रोल केले, सायंकाळी दारे-खिडक्या न उघडताच टीव्ही पाहत बसले
  • पुणे येथे बिबवेवाडीत घडलेला भयंकर प्रकार, पती निवृत्त बँक अधिकारी

प्रतिनिधी

Feb 14,2020 08:04:00 AM IST

पुणे - घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दारे-खिडक्या उघड्या न ठेवल्याने दुर्गंधीमुळे निवृत्त बँक अधिकारी आणि त्याच्या पत्नीचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री बिबवेवाडीतील गणेश विहार सोसायटीत घडली. अविनाश सदाशिव मजली (६४) आणि अपर्णा अविनाश मजली (५४) अशी मृत्युमुखी पडलेल्या दांपत्याची नावे आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर वडिलांची आरडाओरड ऐकून मजली दांपत्याची मुलगी श्रावणी हिने आई-वडिलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वाहतूक कोंडीत गाडी ४० मिनिटे अडकल्याने अखेर मजली दांपत्याला मृत्यूने गाठलेच.


मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास अविनाश यांनी घरात पेस्ट कंट्रोल करून घेतले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास अविनाश पत्नीसह त्यांच्या भावाच्या घरी गेले. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे लगेच घरी न जाण्याचा सल्ला अविनाश यांचा भाऊ अशोक यांनी त्यांना दिला. मात्र, तरीही अविनाश आणि अपर्णा रात्री सातच्या सुमारास घरी गेले. त्यानंतर त्यांनी घराची दारे-खिडक्या उघड्या न करता पंखा सुरू केला नाही. दोघेही टीव्ही पाहत बसले. त्यानंतर काही वेळाने घरात मोठ्या प्रमाणावर पेस्ट कंट्रोलची दुर्गंधी असह्य झाल्याने अविनाश आणि अपर्णा यांना गुदमरण्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे अपर्णा मू्र्च्छित होऊन सोफ्यावरून खाली पडल्या.


श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने अविनाशही मोठ्याने ओरडत होते. ही आरडाओरड ऐकून त्यांची मुलगी श्रावणी (२१) घरी आली असता आई खाली पडलेली आणि वडील ओरडत असल्याचे तिला दिसून आले. तिनेही मदतीसाठी आरडाओरडा करीत शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर शेजाऱ्यांनी अविनाश आणि अपर्णा या उभयतांना खासगी मोटारीत बसवून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मार्गक्रमण केले. मात्र, परिसरात दोन्ही बाजूला रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सुमारे ४० मिनिटांनी मजली दांपत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती श्वासोच्छ्वास गुदमरल्याने अविनाश आणि अपर्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. उसगावकर अधिक तपास करीत आहेत.

सहा महिन्यांपूर्वीच आले होते गणेश विहार सोसायटीत


मजली कुटुंब मूळचे बेळगावचे असून नोकरीनिमित्त ते पुण्यात राहत आहे. अविनाश, अपर्णा आणि श्रावणी असे तीन जण मागील सहा महिन्यांपूर्वी बिबवेवाडीतील गणेश विहार सोसायटीत राहायला गेले होते. अविनाश हे शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र या मुख्य शाखेतून नुकतेच निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी अपर्णा गृहिणी होती. मुलगी श्रावणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

गॅस ट्रीटमेंट पेस्ट कंट्रोलमुळे गुदमरल्याची शक्यता

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे मरण पावलेल्या दांपत्याने गॅस ट्रीटमेंट पेस्ट कंट्रोल केले असावे. यात एका द्रोणमध्ये रसायन ठेवून खिडकी, दरवाजे बंद करून गॅस निर्माण केला जातो. मात्र, यामुळे घरातील हवेतील ऑक्सिजन कमी होऊन व्यक्तीचा जीव गुदमरू शकतो. त्यामुळे रसायनविरहित पेस्ट कंट्रोल करण्याकडे नागरिकांनी लक्ष्य द्यावे, असा सल्ला निस्ट पेस्ट कंट्रोल कंपनीचे व्यवस्थापक दीपक दणके यांनी दिला. गेल्या ११ वर्षांपासून ते पेस्ट कंट्रोल कंपनीत काम करतात.

रस्ता कामामुळे दीड किमीसाठी ४० मिनिटे वाया

परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. दांपत्याला गाडीने प्रथम जवळच्या चिंतामणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोघांचीही प्रकृती नाजूक असल्याने तेथील डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.रात्री सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी निघाले.रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली. अवघे दीड किमी अंतरासाठी सुमारे ४० मिनिटे वाया गेली अन् मजली दाम्पत्याला मृत्यूने गाठले.

पुण्यात यापूर्वीही ठरले पेस्ट कंट्रोलचे बळी

> गेल्या वर्षी मे महिन्यात ढेकूण घालवण्यासाठी घरात पेस्ट कंट्रोल करणे दोन तरुणांच्या जिवावर बेतले होते. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर रूममध्ये झोपलेले दोन तरुण दुसऱ्या दिवशी मृतावस्थेत आढळले होते. बीडवरून सदर दोघे कामाकरिता पुण्यात आले होते आणि एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये ते दोघे काम करत होते. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.

> सप्टेंबर २०१८ मध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काही वेळाने घरात येऊन झोपलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याची घटना सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर येथे घडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यातील सार्थक डोंगरे या नऊ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.


X
COMMENT