आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भातच मुलांना संस्कारी करण्यासाठी अभ्यासक्रम, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पटवून दिले महत्त्व

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

कानपूर - उत्तर प्रदेशमधील मातांच्या गर्भात असलेली मुले आता संस्कारी असणार आहेत. कानपूरमधील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ यासंदर्भात विशेष अभियान राबवणार आहे. गर्भसंस्कारांविषयी गरोदर मातांना प्रशिक्षण देण्यात येईल. एक जानेवारीपासून या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असून, यामध्ये गरोदर महिलांसह अविवाहित मुलींनादेखील प्रवेश देण्यात येणार आहे. छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.नीलिमा गुप्ता यांनी याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, हा विषय महत्त्वपूर्ण असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार अाहे. अभ्यासक्रमाचा अवधी तीन व सहा महिन्यांचा असेल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल. या अभ्यासक्रमासाठी गरोदर महिलांसह, सामान्य महिलादेखील अर्ज करू शकतात. १२ वीनंतर या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. या महिन्यात शैक्षणिक परिषदेत या अभ्यासक्रमाला संमती मिळाल्यानंतर, एक जानेवारीपासून याचे वर्ग सुरू करण्यात येतील. लोकांमध्ये जागरूकता येण्यासाठी सुरुवातीला प्रमाणपत्र कोर्स सुरू केला असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, येणाऱ्या पिढीचे भविष्य चांगले ठेवण्यासाठी आणि मुलांवर योग्य संस्कार व्हावे यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. या अभ्यासक्रमासाठी गणेश शंकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात येईल. तसेच पॅरामेडिकल संस्थेचे शिक्षकही यात सहभागी होतील, अशी माहिती कुलगुरूंनी दिली. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे समन्वयक डॉ. प्रवीण कटियार यांनी सांगितले, या प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे, छत्रपती शाहूजी महाराज हे पहिले विद्यापीठ आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत हा अभ्यासक्रम चालवला जाईल. तीन महिन्यांचा अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्स इन गर्भ संस्कार या नावाने तर ६ महिन्यांचा अभ्यासक्रम अॅडव्हान्स कोर्स इन संस्कार या नावाने चालवला जाईल. नवीन वर्षापासून या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्यात येतील. 
राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पटवून दिले महत्त्व 


११ सप्टेंबरला झालेल्या ३४ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी गर्भसंस्काराचा विषय मांडला होता. विद्यार्थिनींना भविष्यात मातृत्वाला सामोरे जावे लागणार आहे. तणाव आणि धावपळीमुळे त्यांच्या अपत्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यांना गर्भसंस्कारांविषयी माहिती दिल्यास, त्यांच्या अपत्यावर चांगले संस्कार होतील, असे मत आनंदीबेन पटेल यांनी भाषणादरम्यान मांडले होते. त्यानंतरच विद्यापीठ हा प्रयोग राबवणार आहे.