आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रयागराज/लखनऊ - अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला मोठा दणका दिला. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आरोपींचे फलक हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
लखनऊचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना १६ मार्चपर्यंत फलक हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोविंद माथूर आणि रमेश सिन्हा यांच्या पीठाने दिले. तसेच याबाबतची माहिती निबंधकांना सादर करण्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना यासंदर्भात शपथपत्र सादर करण्यास सांगितले. दरम्यान, हा मोठा विजय असल्याची भावना आरोपी दीपक कबीर याने न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली. तो म्हणाला की, न्यायालयाने आमचे दु:ख समजून घेतले. जी बाब चुकीची होती ती हटवण्यास सांगितली. राज्य सरकारने लखनऊमध्ये वेगवेगळ्या चौकात तोडफोड आणि हिंसाचारातील ५७ आरोपींकडून वसुली करण्याचे फलक लावले होते. यात आरोपींचे छायाचित्रही लावण्यात आले होते. शहरभरात असे १०० फलक लावण्यात आले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोविंद माथूर यांनी प्रकरणाची स्वत: दखल घेत रविवारी सुटीच्या दिवशीही सुनावणी केली होती. सीएएविरोधातील आंदोलकांचे फलक लावण्याची सरकारची कारवाई अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले होते. कुठल्या कायद्यांतर्गत हे फलक लावले आहेत, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनच्या भावाला अटक : आम आदमी पक्षाचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेन याचा भाऊ शाह आलम याला दिल्ली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्यावर गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोप आहे. दुसरीकडे सीएएविरोधात लोकांना भडकावल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) सदस्य मोहम्मद दानिशला दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक केली.
सीएएविरोधातील आंदोलनातील महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; महिन्यातील दुसरी घटना
लखनऊमधील क्लॉक टॉवर परिसरात सीएएचा विरोध करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील एका महिलेचा रविवारी मृत्यू झाला. फरिदा असे मृत महिलेचे नाव आहे. ५५ वर्षीय फरिदा या शुक्रवारी पावसात भिजल्याने आजारी पडल्या होत्या. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या डालीगंज येथील रहिवासी आहेत. यापूर्वी २० वर्षीय तय्यबा या विद्यार्थिनीचा आंदोलनाच्या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.