आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाच्या पैशातून व्यवसायासाठी घेतलेली दाेन विमाने, स्पीड बोटींच्या विक्रीस कोर्टाची परवानगी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाेटाळ्याची व्याप्ती सात हजार काेटींवर, आजवर दहा आराेपी अटकेत
  • 15 आलिशान कार, संचालकांसह कर्जदारांच्या सुमारे 550 काेटींची मालमत्ता गुन्हे शाखेकडून जप्त

​​​​​​​नाशिक : महाराष्ट्रासह सहा राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या पंजाब महाराष्ट्र काे-अाॅप बँकेच्या (पीएमसी) घाेटाळ्याची व्याप्ती सुमारे ७ हजार काेटींपर्यंत पाेहोचणार असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली असून बांधकाम व्यवसायासाठी काढलेल्या कर्जातून घेतलेल्या काेट्यवधींच्या किमतीची दाेन चार्टर विमाने व स्पीड बाेटींच्या विक्रीस न्यायालयाने परवानगी दिली आहे. दरम्यान, १५ आलिशान कार व ५५० काेटींची मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आल्यावर आर्थिक गुन्हे शाेध पथकाने ही मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

बँकेच्या ठेवी व कर्जाचा विस्तार बघता देशभरातील माेठ्या बांधकाम व्यावसायिकांसह लघु उद्याेजकांनी येथून कर्ज घेतले हाेते. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जाॅय थाॅमस यांचे एचडीआयएल ग्रुपच्या संचालकांशी थेट संबंध असल्याने कर्ज देण्यास प्रारंभ झाल्याचे तपास अहवालात उघड झाले आहे. ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक राकेशकुमार कुलदीपसिंग वाधवान व अध्यक्ष सारंग राकेशसिंग वाधवान यांना दिलेली कर्जाची रक्कम लक्षात घेता एकूण ठेवींच्या रकमा व बँकेची उलाढाल बघता सुमारे ७५ टक्के कर्ज याच ग्रुपला वितरीत केल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या लेखा परीक्षणात उघडकीस आली. कंपनीने कर्जाचे हप्ते न फेडल्याने त्यांची थकीत रक्कम वाढत गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली.


साधारणत: २०१६ पासून महिन्याच्या महिन्याला ठेवीदारांना व्याज देण्यास अडचणी निर्माण झाल्या हाेत्या. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतनासाठीही पैसे बँकेकडे शिल्लक नसल्याने संचालक मंडळ व प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. त्यातूनच वसुली विभागाचे व्यवस्थापक जसबिरसिंग मठ्ठा यांनी ३० सप्टेंबर २०१९ ला केलेल्या पाेलिसांत तक्रारीत ४ हजार ३५५.४६ काेटींचा अपहार झाल्याचे म्हटले आहे. एचडीआयएलची ४४ खाती असून त्यांनी घेतलेले कर्ज व व्याज थकल्याने संचालक मंडळाने हे कर्ज बेकायदेशीरपणे नियमित २१०४९ खातेदारांच्या नावावर वर्ग केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

बँकेच्या हिशेबाचे दर महिन्याला नियमित लेखा परीक्षण करण्यात येते. मात्र, त्यातही एचडीआयएलच्या थकीत कर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले. दर तीन महिन्याला बाहेरच्या संस्थेकडून हाेणारे लेखा परीक्षण व रिझर्व्ह बँकेकडून वर्षातून एकदा लेखा परीक्षण हाेऊनही थकीत कर्जाची व त्यावरील वाढत्या व्याजाची माहितीच बँकेकडून त्या संस्थांना देण्यात आली नाही. मार्च २०१९ मध्ये बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत त्यात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनासाठीच रक्कम शिल्लक नसल्याचे दिसून आल्याने वसुली पथकाने बँक व्यवस्थापकाकडे तगादा लावताच हा प्रकार समाेर आला.

तपासात घाेटाळे उघड

बँकेचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांचे कर्जदार संस्थेच्या संचालकांशी असलेले संबंध आणि त्यातून हेतुपुरस्कृत गुन्हा घडवून आणत गुन्ह्याची रचना, कार्यपद्धती दस्त, शासनाची, ठेवीदारांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जाॅय थाॅमस व अध्यक्ष वरियमसिंग यांचे कर्जदार राकेशकुमार व सारंग वाधवानशी संबंध हाेते. त्यांच्या संमतीनेच एचडीआयएलच्या दहा खात्यात अफरातफर झाली. संचालक मंडळाच्या संमतीनेच बनावट कागदपत्रे व स्वाक्षरी करून घाेटाळा केल्याचे आढळले.

५५० काेटींची मालमत्ता जप्त

एचडीआयएलकडून कर्जाच्या रकमेचा व्यवसायासाठी वापर न करता त्याचा मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये वसई, मुंबई, पालघर, बाेईसर भागात आलिशान फ्लॅट, फार्म हाऊस, दाेन चार्टर विमाने, स्पीड बाेट, बग्गी यासह बीएमडब्ल्यू मर्सिडीझ, लँड क्रूझर यासारख्या महागड्या कार अशी सुमारे ५५० काेटींची मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. ती जप्त करण्यात आली असून ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी त्यांच्या विक्रीची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. अजय मिसर, विशेष सरकारी वकील
 

बातम्या आणखी आहेत...