आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • COVID 19: Coronavirus Cases Of Infection Increased To India, 3 Year Old Tested Positive

केरळमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याला तर काश्मीरात वृद्ध महिलेला कोरोनाची लागण, देशात आता 43 रुग्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पश्चिम बंगाल, लडाखमध्ये प्रत्येकी एका-एका संशयिताचा मृत्यू, अधिकृत दुजोरा नाही
  • बांग्लादेशात कोरोनाव्हायरसचे तीन रुग्ण आढळल्याने पीएम मोदींचा दौरा रद्द

नवी दिल्ली - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची भारतातील संख्या आता 43 झाली आहे. इटलीतून केरळला आलेल्या एका 3 वर्षीय मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले. 7 मार्च रोजी या चिमुकल्याचे आई-वडील कोची विमानतळावर पोहोचले होते. थर्मल स्क्रीनिंगमध्ये त्यांच्यात कोरोनाचे संकेत मिळाले होते. यानंतर वेळीच तिघांना आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. यासोबतच, काश्मीरात एका वृद्ध महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 63 वर्षीय महिला इराण येथून भारतात आली होती. दरम्यान, काश्मीरात शनिवारी दोन संशयित रुग्ण सापडले होते. परंतु, त्यांचे रिपोर्ट अजुनही समोर आलेले नाहीत.

पश्चिम बंगाल, लडाखमध्ये प्रत्येकी एक-एक संशयिताचा मृत्यू

देशभर कोरोना व्हायरसची दहशत पसरली असताना पश्चिम बंगालमध्ये रविवारी एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला एका विशेष वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले होते. परंतु, त्याचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झाला की नाही? किंवा त्याला कोरोनाची लागण झालेली होती का? याबद्दल अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे, इराणवरून लडाखला परतलेल्या एका वयोवृद्ध पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्याचा देखील मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या प्रकरणाप्रमाणेच या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती की नाही हे अद्याप औपचारिकरित्या स्पष्ट झाले नाही.

मोदींचा बांग्लादेश दौरा रद्द

भारताचा शेजारील देश बांग्लादेशमध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला प्रस्तावित बांग्लादेश दौरा रद्द केला. नियोजित कार्यक्रमानुसार, ते 17 मार्च रोजी बांग्लादेशचे माजी राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांच्या जन्म शताब्दी समारंभात सहभागी होणार होते. परंतु, कोरोना व्हायरसमुळे त्यांनी हा दौरा टाळला आहे.