आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदवडमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण सोमवारी सापडला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 68 वर्षीय संशयित रुग्णाला सध्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मूळचा मुंबईतील वाशीचा रहिवासी असलेला हा रुग्ण 29 फेब्रुवारीला न्यूझीलंडहून मुंबईला परतला होता. गेल्या काही दिवसांपासून नाशिकला आपल्या बहिणीकडे असताना त्याला श्वास घेण्यात अडथळे आणि कोरोनाची इतर लक्षणे दिसून आली. सुरुवातीला त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. आता मात्र, त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाने सोमवारी सांगितल्याप्रमाणे, तो नाशिकच्या चांदवड येथे आपल्या बहिणीकडे थांबला होता. त्याच दरम्यान अस्वस्थपणा आणि श्वास घेण्यात अडथळे निर्माण झाले. 4 मार्च पासून त्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजता त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशयित रुग्णाला हृदयविकार आहे. काही वर्षांपूर्वीच त्याची अँजिओप्लास्टी झाली होती. काहींनी त्याला न्युमोनिया झाल्याचा अंदाज सुद्धा वर्तवला. तरीही त्याच्या थुंकीचे काही सॅम्पल पुण्यातील नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीला पाठवले आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी संबंधित रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

नाशिकसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण नाही

नाशिकमध्ये आणखी एका 69 वर्षीय रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. ती व्यक्ती नुकतीच दुबईतून परतली होती. त्याला सुद्धा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तसेच यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. चाचण्यांमध्ये त्याच्या शरीरात कोरोना व्हायरस आढलेले नाही. तत्पूर्वी इटली, इराण आणि अमेरिकेतून परतलेल्या तीन जणांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट सुद्धा नेगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, देशभर सोमवारपर्यंत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 43 पर्यंत पोहोचली आहे. तर महाराष्ट्र अद्याप कोरोना व्हायरसाच एकही रुग्ण सापडलेला नाही. राज्य सरकारच्या वतीने सुद्धा यादंर्भात स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...