Cancer / संशोधनाचा निष्कर्ष : गाईच्या तुपात आहे कॅन्सरशी लढण्याची ताकद

शरीरात जमा होणाऱ्या अनावश्यक चरबीमुळे कॅन्सरला कारणीभूत असणारे घटक वाढतात

दिव्य मराठी वेब

Sep 11,2019 12:15:00 AM IST

वनस्पती तेलाच्या सेवनाऐवजी गाईचे शुद्ध तूप सेवन केल्यामुळे कॅन्सरशी सामना करण्याची शरीराची ताकद वाढते. गाईच्या तुपात असणाऱ्या मायक्रो न्यूट्रियंट्समध्ये कॅन्सरशी लढा देण्याची क्षमता असते. हरियाणाच्या करनालस्थित नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने संशोधनाअंती हा निष्कर्ष काढला आहे. या इन्स्टिट्यूटच्या मते, शरीरात जमा होणाऱ्या अनावश्यक चरबीमुळे कॅन्सरला कारणीभूत असणारे घटक वाढतात. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या ताज्या अंकात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली.


असे केले संशोधन
२१ दिवसांच्या तीस-तीस उंदरांचे दोन समूह करण्यात आले. विशिष्ट रासायनिक तत्त्वांचा वापर करून त्या उंदरांमधे कॅन्सर निर्माण करण्यात आला. वैज्ञानिकांनी जवळपास ४४ आठवडे या उंदरांच्या दोन समूहापैकी एका समूहाला गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेले भोजन दिले तर दुसऱ्या समूहाला वनस्पती तेलापासून बनवलेले भोजन दिले. निरीक्षणातून असे लक्षात आले की, उंदरांच्या ज्या समूहाला सोयाबीन तेलयुक्त खाद्य देण्यात आले होते, त्यांच्यामधे कॅन्सर वाढण्याची प्रवृत्ती तुलनेने जास्त आहे. कॅन्सरशी सामना करण्याची ताकदही गायीच्या तुपापासून बनवलेले खाद्य खाणाऱ्या उंदरामधे जास्त असल्याचे दिसून आले आहे.


या संशोधनादरम्यान सोयाबीन तेलयुक्त पदार्थ खाणाऱ्या अनेक उंदरांचा मृत्यूही झाला. वनस्पती तेलयुक्त पदार्थ खाणाऱ्या उंदरांमध्ये असे खाद्यान्न न घेणाऱ्यांच्या तुलनेत कॅन्सर होण्याची शक्यताही जास्त असते, असेही आढळून आले आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती भारतीयांमध्ये वाढत आहे. त्यात तरुणाई आघाडीवर आहे. तरुणांमधे तेलकट, फास्ट फूड खाण्याची प्रवृत्ती वाढते आहे. अलीकडच्या काळात तोंडाचा आणि छातीचा कॅन्सरही खूप मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. भारतात दरवर्षी कॅन्सरचे नऊ लाख नवीन रुग्ण समोर येत आहेत.

X
COMMENT