आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत मुंडे बहीण- भावात श्रेयवादाचा कलगीतुरा रंगला; ६ महिन्यांत दुसरा प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील पंचायत समितीच्या लोकार्पणावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा चांगलाच रंगला. परळी पंचायत समिती धनंजय मुंडे गटाच्या ताब्यात असून या इमारतीचे लोकार्पण करताना भाजपने या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले नाही म्हणून सभापती, उपसभापतींसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आदल्याच दिवशी इमारतीचे उद्घाटन केले. शेवटी हे प्रकरण पोलिसांत गेले. जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. दुसऱ्या दिवशी मंत्री पंकजा मुंडे यांनी या लोकार्पणाचा कार्यक्रम घेऊन धनंजय मुंडेंवर सडकून टीका केली. मात्र परळीतील मूलभूत प्रश्नांवर  बहीण भावाचे अजूनही  लक्ष नसल्याचे दिसते. 


परळी  पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन १२ जुलैला होणार असल्याचे भाजपने जाहीर केले. भाजपच याचे श्रेय घेत असल्याने पं. स. सभापती उपसभापती व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हे रुचले नाही. त्यांनी आदल्याच दिवशी संध्याकाळी श्रीफळ फोडून फीत कापत इमारतीचे उद्घाटन करून वादाला तोंड फोडले. ही पं. स. राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने तिच्या  इमारतीसाठी धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला असून भाजपने  केवळ श्रेय लाटण्यासाठी उद््घाटनाचा घाट घालत  पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.  शेवटी या इमारतीच्या उद्घाटनाचे प्रकरण थेट परळी पोलिसांत गेले. गटविकास अधिकाऱ्यांना परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी लागली. या तक्रारीवरून सभापतीसह उपसभापती अशा एकूण   ३०  कार्यकर्त्यांवर जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला. 

 

बहुतांश संस्था राष्ट्रवादीकडे
राज्यात व केंद्रात जरी भाजपची सत्ता असली तरी परळी मतदार संघातील  बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा श्रेयवाद सध्या रंगत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम्ही किती विकासकामे केली, विरोधकांनी काहीच केले नाही, अशी स्पर्धा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे .

 

६ महिन्यांत दुसरा प्रकार 

पंकजा  व धनंजय यांच्यातील सत्तासंघर्ष सध्या टोकाला आहे. शासनाकडून मंजूर कामांचे भूमिपूजन, लोकार्पणासाठी दोघांत स्पर्धा सुरू आहे.  सहा महिन्यांपूर्वीच पांगरी व तळेगाव येथील नळयोजना कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी केले होते.  दुसऱ्याच दिवशी मंत्री पंकजा मुंडेंनी याच कामाचे पुन्हा भूमिपूजन केले होते. 
 

 

परळीतील प्रश्न कायमच 
मुंडे बहीण-भावात श्रेयवाद सुरू असला तरी मागील साडेचार वर्षांत परळीतील मूलभूत प्रश्न दोघांनाही सोडवता आलेले नाहीत. परळी बसस्थानकाची दुर्दशा कायम असून  उपजिल्हा रुग्णालयात औषधीबरोबर अधिकारी कर्मचाऱ्यांची वाणवा अाहे.  लातूर -मुंबई  बस सुरू सुरू होऊ शकली नाही. परळी -अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे.  परळी बायपासचेही  भिजत धोंगडे कायम आहे. परळी थर्मल बंद आहे. 

बातम्या आणखी आहेत...