आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइव्ह क्रिकेट मॅचवर माेबाइलवरून सट्टा; दाेन बुकींसह तिघांवर गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव - मोबाइलवरून लाइव्ह क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या भावेश पुंजुमल मंधान (व ३०, रा. गौरीशंकर अपार्टमेंट, सिंधी कॉलनी) या तरुणास अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या पथकाने गोलाणी मार्केटमधून मंगळवारी दुपारी ४ वाजता ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल व ३२ हजार रुपयांचे चलन जप्त करण्यात आले. त्याच्यासह दोन बुकींवर शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

जितेंद्र जनवारीमल चोरडिया (रा. जयनगर) व राजेश रतनलाल चोरडिया (रा. भोईटेनगर) अशी दोन्ही बुकींची नावे आहेत. तर भावेश मंधान याचे गोलाणी मार्केटमध्ये सोना मोबाइल नावाचे दुकान आहे. दुकानात बसून तो मोबाइलवरून सट्टा खेळत असताना पोलिसांनी छापा मारून त्याला ताब्यात घेतले होते. जगभरात सुरू असलेल्या विविध क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्यासाठी www.theluckybook.com या वेबसाइटवरून 'लकी' नावाच्या अॅप्लिकेशनवरून हा सट्टा खेळवला जात होता. भावेश मंधान याने मंगळवारीच सट्टा खेळण्यासाठी जितेंद्र चोरडिया याच्याकडून ३२ हजार रुपयांत एक लाख पॉइंट (चलन) खरेदी केले होते. दरम्यान, ही गुप्त माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अंगद नेमाने, अजय पाटील, रफिक कालू, विजय सोनवणे यांच्या पथकाने मंधान याच्या दुकानावर छापा मारला. तो सट्टा खेळताना मिळून आल्यानंतर त्याचा मोबाइल व ३२ हजार रुपयांचे चलन पोलिसांनी जप्त केले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर मंधान याचा जबाब नोंदवण्यात आला. जितेंद्र व राजेश चोरडिया या बुकींकडून आपण चलन घेऊन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा खेळत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार मंधान याच्यावर कारवाई करण्यात आली. जितेंद्र व राजेश चोरडिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

मुळाशी पोहोचण्याचे आव्हान 
सायबर क्राइम पोलिस ठाण्यातून संबंधित वेबसाइट ऑपरेट करणाऱ्या मुख्य बुकींपर्यंत पोहाेचण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. मोठ्या शहरांत बसून बुकी लहान शहरांत ऑपरेट करीत आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या सट्ट्यातून होते आहे. तर दुसरीकडे शेकडो अॅप्लिकेशन प्रमाणे यातही विरंगुळा म्हणून खेळण्याचे आवाहन विविध वेबसाइटच्या जाहिरातींमधून केले जाते आहे. 

 

महाविद्यालयीन तरुणांना ऑनलाइन सट्ट्याचे व्यसन 
जळगाव शहरात मोबाइलच्या माध्यमातून मटका तसेच विविध खेळांवर सट्टा लावला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत अाहेत. उच्चभ्रू कुटंुबातील महाविद्यालयीन तरुणांना यात ओढले जात आहे. घरबसल्या वेगवेगळ्या प्रकारचा सट्टा खेळवून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. अशा प्रकारात पोलिसांकडून केवळ प्रतिबंधात्मक कारवाई होत असल्यामुळे बुकी बेफिकीर आहेत. आपल्याप्रमाणे शेकडो तरुण दररोज क्रिकेटवर सट्टा लावत असून, यात गैर काहीच नाही, असे उत्तर भावेश मंधान याने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दिले होते. 'टाइमपास'च्या नावाखाली बुकींकडून तरुणांना यात ओढले जाते. यानंतर तरुणांना थेट ऑनलाइन सट्ट्याचे व्यसन जडत आहे. 

बातम्या आणखी आहेत...