आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोलकाता - भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी यजमानासाठी कोलकाता शहर व ईडन गार्डन पूर्णपणे सज्ज झाले. येथे भारत व बांगलादेश यांच्यात २२ नोव्हेंबरपासून दुसरी कसोटी खेळवली जाईल. हा सामना गुलाबी चेंडूवर होईल. गुलाबी चेंडूवर होणारा भारताचा पहिला कसोटी सामना असल्याने ईडन गार्डन स्टेडियम व आतील सर्व स्टँडवर गुलाबी प्रकाशाने उजळवले जाईल. शहरातील ऐतिहासिक शहीद मिनार, प्रमुख इमारतीदेखील गुलाबी प्रकाशाने उजळतील. अनेक रस्त्यांना व भिंतींना गुलाबी रंग देण्यात आला आहे. सामन्यापूर्वी गुलाबी फुगे उडवण्यात येतील. नाणेफेक पूर्वी पॅराड्रॉपर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना गुलाबी चेंडू देतील. स्टेडियमजवळ एक मोठा चेंडूच्या आकाराचा फुगा अखेरच्या दिवसापर्यंत उडवण्यात येईल.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सामन्याच्या दोन दिवसांपूर्वी खेळपट्टीचे निरीक्षण केले. या शहराशी संबंध असलेल्या गांगुलीने म्हटले की, “सामन्याच्या पहिल्या चार दिवसांची सर्व तिकिटे विक्री झाली आहेत. हा सामना कसोटी इतिहासात आठवणीतील क्षण असेल. दोन्ही संघांचे माजी कर्णधार, बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह सचिन, गावसतर, कपिलदेव, राहुल, कुंबळे, पी. व्ही. सिंधू, विश्वनाथन आनंद, सानिया मिर्झासारखे इतर खेळांचे खेळाडूदेखील उपस्थित राहतील.’
फेबुलस फाइव्ह नावाचा टॉक शो
कोलकाता क्रिकेट मंडळातर्फे “फेबुलस फाइव्ह’ नावाचा टॉक शोदेखील होईल. ४० मिनिटांच्या या टॉक शोमध्ये भारतीय क्रिकेटचे फेबुलस फाइव्ह गांगुली, सचिन, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण ईडन गार्डनवर २००१ मधील ऐतिहासिक विजयावर चर्चा करतील. कॅब या सामन्यादरम्यान अभिनव बिंद्रा, सानिया, सिंधू व मेरी कोमचा गौरव करेल.
गुलाबी चेंडूचे आकडे लाल चेंडूच्या आकड्याशी जोडू नयेत : गावसकर
सुनील गावसकरांचे म्हणणे आहे की, दिवस-रात्र कसोटीचे आकडे आणि विक्रम नियमित कसोटी सामन्यापासून वेगळे ठेवले पाहिजे. जेव्हा दिवस-रात्र क्रिकेट सुरू झाले तेव्हा अनेक लोकांना वाटले ते यशस्वी होणार नाही. त्यानंतर ते खूप यशस्वी झाले. मला एवढेच वाटते की, गुलाबी चेंडूवरील आकडे वेगळे ठेवल्यास येणाऱ्या पिढीला त्याची माहिती मिळेल. भारताचा गुलाबी चेंडूवरील पहिला सामना असो, मात्र ही एक शानदार टीम आहे, जी आइसलँडमधील बर्फ किंवा सहारा मरुस्थलमधील वाळूच्या वाळवंटात खेळून विजयाचा मार्ग शोधेल. अपल्या खेळाडूंना गुलाबी चेंडूचा अनुभव अाहे की नाही याने काहीच फरक पडत नाही.
मंडळाचे मुख्य क्युरेटर पोहोचले; दोन्ही संघांचा गुलाबी चेंडूवर सराव
भारत आणि बांगलादेश दोन्ही संघांनी बुधवारी गुलाबी चेंडूवर सराव केला. दोन्ही संघ मंगळवारी कोलकाता पोहोचले. बांगलादेशने सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सराव केला. त्यानंतर भारतीय संघ अभ्यासासाठी मैदानात आला. कर्णधार कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह सर्वांनी फलंदाजीचा सराव केला. बीसीसीआयचे मुख्य क्युरेटर आशिष भौमिकदेखील पहिल्या गुलाबी चेंडूवरील सामन्यासाठी शहरात उपस्थित आहेत. त्यांनी खेळपट्टीचा अंदाजदेखील घेतला. यादरम्यान, बांगलादेशचा राखीव सलामीवीर सैफ हसन दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झाला. २१ वर्षीय हसन इंदूरमध्ये पहिल्या कसोटीदरम्यान राखीव क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर आल्यावर बोटाला दुखापत झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.