Cricket / Cricket News : मी अंपायरला चार धावा कमी करण्यास सांगितले नाही : स्टोक्स

अँडरसनने म्हटले होते, स्टोक्सने अंपायरला ओव्हरथ्रोच्या निर्णयात बदल करण्यास सांगितले

दिव्य मराठी

Aug 01,2019 10:18:00 AM IST

लंडन - मी अंपायरला ओव्हरथ्रोच्या चार धावा कमी करण्यास सांगितले नाही, असे इंग्लंडच्या विश्वचषकात हीरो ठरलेल्या बेन स्टोक्सने म्हटले. १४ जुलै रोजी लॉर्ड््सवर झालेल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड दोघांनी २४१ धावा काढल्या. सुपर ओव्हरनंतरदेखील धावा समान राहिल्या. त्यानंतर सर्वाधिक चौकाराच्या आधारे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. इंग्लंडच्या डावातील अखेरच्या षटकात न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलचा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेला. अंपायर धर्मसेना यांनी इंग्लंडला एकूण ६ धावा दिल्या होत्या आणि सामना बरोबरीत सुटत सुपर ओव्हरमध्ये गेला. विश्वचषक समाप्त झाल्यानंतर काही दिवसांनी स्टोक्सचा सहकारी खेळाडू जेम्स अँडरसनने म्हटले होते की, स्टोक्स दु:खी होता आणि त्याने अंपायरला ओव्हरथ्रोच्या चार धावा कमी करण्यासाठी सांगितले होते.


स्टोक्सने बीसीसीचा कार्यक्रम टफर्स अँड वॉनमध्ये म्हटले की, “मी ते सर्व पाहिले. मी असे बोललो का याचा विचार करत होतो. मी हृदयावर हात ठेवून सांगतो, असे मी अंपायरला काही बोललो नाही. मी टॉम लाथमकडे गेले आणि त्याला म्हटले मला माफ कर. मी केन विलियम्सनकडे पाहून त्याचीदेखील माफी मागितली.’

X