आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू घोटाळा : यूपीचे माजी मंत्री गायत्री प्रजापतींसह चार आयएएस अधिकाऱ्यांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील वाळू उत्खनन घोटाळा प्रकरणात सीबीआयने माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्यासह चार आयएएस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने याप्रकरणी राज्यात १२ ठिकाणांवर छापेही टाकले आहेत. 


अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री गायत्री प्रजापती, तत्कालीन प्रधान सचिव जिवेश नंदन, विशेष सचिव संतोषकुमार आणि तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी अभय आणि विवेक यांचा समावेश आहे. 


उत्तर प्रदेश सरकारने राज्यात वाळू उत्खननाचे नवे ठेके देण्यासाठी तसेच त्यांचे नूतनीकरण करण्यासाठी ३१ मे २०१२ रोजी ई-टेंडरिंग अनिवार्य केले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २९ जानेवारी २०१३ रोजी हा निर्णय योग्य ठरवला होता. प्रजापती यांच्याशी संबंधित प्रकरणात सीबीआयने म्हटले आहे की, शिवसिंह आणि सुखराज या लाभार्थींनी आपल्याला मिळालेल्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यासाठी मंत्री प्रजापती यांच्या प्रभावाचा वापर केला. सीबीआयने केलेल्या आरोपानुसार, सुखराज यांच्या प्रकरणात २०१४ मध्ये नंदन कुमार आणि फतेहपूरचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी अभय यांनी मंत्री प्रजापती यांच्याशी संगनमत करून कंत्राटाचे नूतनीकरण करून घेतले. शिवसिंह यांनी २०१२ मध्येच आपल्या कंत्राटाचे नूतनीकरण करून घेतले होते. हा सर्व प्रकार ई-टेंडरिंग धोरणाचे उल्लंघन करून कंत्राटाचे नूतनीकरण करून घेतल्याचा आरोप आहे. दुसऱ्या प्रकरणात, देवरियाचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी विवेक यांनी शारदा यादव यांच्या कंत्राटाच्या नूतनीकरणाला परवानगी दिली. कंत्राट नूतनीकरणासाठी यादव यांनी दाखल केलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने ५ एप्रिल २०१३ रोजी फेटाळून लावली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी नूतनीकरण झाले. 

 

सीबीआयचे १२ ठिकाणी छापे
एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयच्या पथकांनी राज्यात १२ ठिकाणी छापे मारले. त्यात सध्या बुलंदशहरचे जिल्हा दंडाधिकारी अभय आणि सध्या उत्तर प्रदेश स्किल डेव्हलपमेंट मिशनचे संचालक विवेक यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे. बुलंदशहर, लखनऊ, फतेहपूर, आझमगढ, अलाहाबाद, नोएडा, गोरखपूर, देवरियासह एकूण १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. अभय यांच्या निवासस्थानातून रोख ४७ लाख रुपये तर देवरियाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी देवीशरण उपाध्याय यांच्या घरातून रोख १० लाख रुपये जप्त केले.उपाध्याय हे सध्या आझमगढमध्ये सीडीओ या पदावर कार्यरत आहेत. विवेक यांच्या निवासस्थानातून काही कागदपत्रे जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...