Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | crime against two teachers of ashram school in madhi

मढीच्या आश्रमशाळेतील दोन शिक्षकांवर विनयभंगाचा गुन्हा

प्रतिनिधी | Update - Sep 06, 2018, 11:29 AM IST

तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळेतील दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिस

 • crime against two teachers of ashram school in madhi

  पाथर्डी- तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ आश्रमशाळेतील दोन शिक्षकांनी अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली. संतप्त पालकांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात विद्यार्थिनींसह येऊन अधिकाऱ्याकडे दाद मागितली.


  मढी येथे शासनमान्य आश्रमशाळा असून तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत ५० मुली व ७० मुले शिक्षण घेतात. एका विद्यार्थिनीच्या तिसगाव येथील मावशीने विनयभंगाबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, आश्रमशाळेतील शिक्षक ईश्वर सुखदेव सुरसे (चितळी, ता. पाथर्डी) याने पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनीला बोलावून चौकशी केली. विद्यार्थिनी शिक्षकाकडे गेली असता त्याने तिचा विनयभंग केला. संबंधित मुलीची मावशी मढी येथील आश्रमशाळेत अन्य नातेवाईकांसमवेत गेली. त्यांच्याशी बोलताना अन्य मुलींनीही गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारे त्रास दिला जातो, हे सांगितले. ही हकिकत ऐकून संतप्त नातेवाईकांनी मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात धाव घेतली.


  शिक्षकांच्या त्रासाला कंटाळलेल्या आठ-दहा मुलींनी पोलिसांना घडलेले प्रकार सांगितले. काही नातेवाईंकांनी त्रस्त मुलींची व्हिडीओ क्लीप दाखवली. त्यानंतर पोलिस निरीक्षक रत्नपारखी यांनी सहकाऱ्यांसह आश्रमशाळेला रात्री उशिरा भेट दिली. तोपर्यंत अन्य विद्यार्थिनी झोपी गेल्या होत्या. मुलींच्या तक्रारीनुसार ईश्वर सुखदेव सुरसे (चितळी, ता. पाथर्डी) व नामदेव बबन धायतडक (पालवेवाडी, ता. पाथर्डी) या दोन शिक्षकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पाच-सहा दिवसांपूर्वी यातील एका शिक्षकाने रात्री नऊ व अकराच्या सुमारास वेगवेगळ्या दोन विद्यार्थिनींना मान दाबण्यास सांगत एकीचे पाय धरून जवळ ओढले. इतर मुलींनासुद्धा दोन्ही शिक्षक असाच त्रास देतात, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (अॅट्रासिटी), पॉस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तपास उपअधीक्षक मंदार जावळे करत आहेत.


  शिक्षक दिनी हा प्रकार उघडकीस आल्याने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या शिक्षकांचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध होत आहे. ज्ञानदानाऐवजी मानसिक छळ व भावनिक शोषणाचा प्रकार शिक्षकांकडून झाल्याने पाेलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.


  घटना निंदनीय, संस्था कारवाई करेल...
  दरम्यान, या घटनेची माहिती कळताच जिल्ह्याच्या विविध भागात राहणाऱ्या पालकांनी आपली मुले घरी नेली. त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही. सकाळी आश्रमशाळेला भेट दिली तेव्हा बहुसंख्य विद्यार्थी घरी निघून गेल्याचे दिसले. याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष दीपक साळवे म्हणाले, झालेली घटना अतिशय निंदनीय असून झालेला प्रकार पोलिस तपासात निष्पन्न झाल्यास संस्था संबंधित शिक्षकांच्या विरूध्द कारवाई करेल. संस्थेच्या लौकिकाला बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

Trending