आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थान गणपती मंदिराची दानपेटी विहिरीतूनही चोरीला गेल्याचा पोलिसांना संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी पळवणाऱ्या दोन्ही चोरट्यांना सिटी चौक पोलिस व गुन्हे शाखेने बारा तासांत अटक केली. मात्र त्यांनी फेकलेली दानपेटी अद्याप सापडलेली नाही. ती पुन्हा चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषद मैदानावरील विहिरीत दानपेटी फेकल्याचे चोरट्यांनी सांगितले होते. परंतु विहिरीत दानपेटी आढळून आली नाही. परिसरातील कचऱ्यात ती फेकल्याच्या संशयावरून पोलिसांनी मंगळवारी काही सफाई कर्मचाऱ्यांची चार ते पाच पास चौकशी केली. 

 

शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजाबाजार भागातील संस्थान गणपती मंदिरातून पिराजी संजय सोनवणे (३०) व इब्राहिम खान आलम खान (३३, रा. दोघेही पडेगाव) यांनी रविवारी पहाटे दानपेटी पळवली. सिटी चौक पोलिस व गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या रिक्षाच्या मदतीने या दोघांना अटक केली. दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने दोघांनी ही चोरी केली होती. पिराजीचे दारू पिताना भांडण झाल्याने त्याला मारहाण झाली. पिराजीवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून इब्राहिम खानला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
 
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान 
दरम्यान, पोलिस कोठडीत पिराजीने पैसे काढून जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विसर्जन विहिरीत दानपेटी फेकल्याची माहिती दिली. पोलिसांनी सोमवारी विहिरीची पाहणी केली. परंतु पेटी आढळून आली नाही. इतरही अनेक विहिरींत तपासणी करण्यात आली. पहाटे कचरा वेचण्यासाठी आलेल्या महिलांनी ती पेटी पळवल्याच्या संशयावरून सिटी चौक पोलिसांनी कचरा वेचक कर्मचाऱ्यांची चार ते पाच तास चौकशी केली. परंतु त्यातूनही काही हाती लागले नाही. त्यामुळे चोरीला गेलेली दानपेटी पुन्हा चोरीला गेल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...