आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन ठिकाणी चोरी करून रोख रकमेसह दागिने घेऊन चोरटे पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावमही- देऊळगावमही येथे रविवारच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सचिन सोनसळे तसेच संजय साकला यांच्या घरी चोरी करून रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण लाखो रुपयांचा माल घेऊन चोरटे पसार झाले. हे चोरीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. परंतु अद्यापही या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे हे चोरटे केव्हा जेरबंद होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
 
रविवारच्या मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी टॉमीच्या साह्याने डॉ. सचिन रामदास सोनसळे यांच्या घराच्या मागील बाजूने प्रवेश करून हॉस्पिटल व मेडिकल मध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये घेतले. परंतु त्याचवेळी डॉ. सचिन यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढून आपला मोर्चा संजय साकला यांच्या घराकडे वळवला. यावेळी संजय कांतीलाल साकला यांच्या घरी कोणी नसल्याने चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यातील लाखो रुपयांचे दहा ते पंधरा तोळे सोने लंपास केले. दोन ठिकाणी झालेल्या चोरी मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी अनेक छोट्या-मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु या चोऱ्यांचा तपास पोलिसांना लागत नाही. त्या मुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वेळा नागरिक चोरी झाल्याच्या तक्रारी करतात. परंतु या तक्रारी केवळ चौकशीवर ठेवल्या जातात. तसेच रात्री गस्त घालण्यात पोलिस असमर्थ असून या ठिकाणी वाढीव पोलिस कर्मचारी देऊन गस्त घालावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिस चौकी प्रमुख सहायक पोलिस उपनिरीक्षक अकिल काझी यांनी धाव घेत पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच लवकर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी नागरिकांना दिले आहे 
 
स्थानिक गुन्हेगार प्रवृत्तीचे चोरटे देतात बाहेरील चोरट्यांना अचूक माहिती- अनेक वेळा छोट्या-मोठ्या चोऱ्या करून पोलिसांना चकवा देऊन मोठ्या शिताफीने चोरटे पसार होतात. दिवसेंदिवस बाहेरील चोरट्यांची वाढत असून स्थानिक गुन्हेगार प्रवृत्तीचे चोरटे बाहेरील चोरट्यांना अचूक माहिती देत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने छडा लावून चोरट्यांचा जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 
 
पोलिस स्टेशनसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव 
धामणगावबढे येथे पोलिस स्टेशनसाठी प्रस्ताव पाठवला. पोलिस कर्मचारी कमी असल्यामुळे तपासात तसेच गस्त घालण्यास अडचणी निर्माण होतात नागरिकांनी न घाबरता घटना घडल्यास तत्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा अकिल काझी, सहायक पोलिस उपनिरीक्षक 
 

बातम्या आणखी आहेत...