आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छादेवी चाैकात दुचाकीस्वार महिलेचा पाठलाग करून साेनसाखळी लांबवली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महामार्गावरून दुचाकीने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी रात्री ९.४५ वाजता इच्छादेवी चौकाजवळ घडली. दुचाकीवर ट्रिपलसीट बसून सोनसाखळ्या, मोबाइल लांबवणाऱ्या भामट्यांनी १६ दिवसांत चारवेळा हातसफाई केली आहे; परंतु अद्याप हे भामटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या शिवाय शहरात चोरी, घरफोड्यांचेही प्रमाण वाढले आहे.


हर्षा योगेश महाजन (वय ३७, रा.भूषण कॉलनी, गिरणा पाण्याची टाकी) यांच्या गळ्यातील ४ तोळे वजनाची सोन्याची सोनसाखळी भामट्यांनी लांबवली आहे. त्या मंगळवारी रात्री ७ वाजता सासू मंदाकिनी लक्ष्मण महाजन यांच्यासोबत दुचाकीने (एमएच-१९, डीए- ५१७५) कमल पॅराडाइज येथे नातेवाइकांकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. तेथून घरी परत जात असताना अजिंठा चौफुलीपासून ट्रिपलसीट असलेले भामटे हर्षा यांच्या दुचाकीच्या मागे-पुढे चालत राहिले. इच्छादेवी चौकाजवळ आल्यानंतर एका भामट्याने हर्षा यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. यानंतर तिघे भामटे भरधाव वेगाने आकाशवाणी चौकाकडे निघून गेले. त्यांनी अारडाआेरड केली; परंतु अंधाराचा फायदा घेत भामटे पसार झाले होते. त्यांच्या दुचाकीस नंबरप्लेट नसल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अंगात टी-शर्ट व जीन्स पॅण्ट परिधान केलेले २५ ते ३० वर्षे वयोगटातील हे भामटे आहेत. हर्षा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजकुमार ससाने तपास करीत आहेत.


गुन्हे शोधची कामगिरी शून्य
सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये १० ते १५ कर्मचाऱ्यांचे एक गुन्हे शोध पथक (डीबी) आहे; परंतु गेल्या महिनाभरापासून या पथकाची कामगिरी दिसून आलेली नाही. पोलिस ठाण्यांमध्ये दैनंदिन कामकाजातून सूट मिळालेल्या या कर्मचाऱ्यांना केवळ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे काम दिले जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडे सोनसाखळी, मोबाइल चोर, घरफोडी, चोरी करणारे आरोपी शोधण्याची प्रमुख जबाबदारी आहे. शहरात सोनसाखळी, मोबाइल लांबवणे, चोरी, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे गुन्हे शोध पथकाची कामगिरी शून्य असून भामटे, चोरट्यांचा उच्छाद वाढल्याचे चित्र शहरात अाहे.


ट्रिपलसीट बसून केलेल्या घटना
१० डिसेंबर : पहाटे ४.३० ते ६.३० वाजेच्या दरम्यान जिल्हापेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून डॉ. शांताराम बडगुजर, प्रणव जोगी, वंदना पाटील व योगेश चौधरी या चार जणांच्या हातातून मोबाइल भामट्यांनी हिसकावले हाेते.
२२ डिसेंबर : मंजूषा रवींद्र पाठक (रा. व्यंकटेशनगर) या कंडारी (ता.जळगाव) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहेत. सकाळी ६ वाजता त्या घरातून बाहेर पडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने पायी चालत होत्या. या वेळी भामट्यांनी त्यांच्या खांद्यावर अडकवलेली पर्स हिसकावून पोबारा केला हाेता. त्यांच्या या पर्समध्ये सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज होता.
२४ डिसेंबर : शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मनीषा संजय देसले (वय ३९, रा.स्वातंत्र्य चौक) यांच्या हातातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल भामट्यांनी लांबवला. ही घटना वर्दळ असलेल्या स्वातंत्र्य चौकात घडली आहे.


सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फटका
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत; परंतु आता त्यातील काही चौकातील कॅमेरे बंद असल्यामुळे गुन्हेगारीच्या घटना त्यात कैद झालेल्या नाहीत. हर्षा महाजन यांची सोनसाखळी लांबवल्यानंतर भामटे इच्छादेवी चौकातून आकाशवाणीकडे गेले. या वेळी त्यांचे पती योगेश महाजन यांनी इच्छादेवी चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत चौकशी केली. हे कॅमेरे बंद असल्याची माहिती नागरिकांनी त्यांना दिली. त्यामुळे भामट्यांचा सुगावा लागू शकला नाही; परंतु या पूर्वी झालेल्या घटनांच्या वेळी या भामट्यांचे फुटेज कैद झाले आहे. पोलिस त्यावरून चौकशी करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...