आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारामारी साेडविण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, 2 जखमी, पोलिसांचा धाक नसल्याने टवाळखोर शेफारले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नाशिक-पुणे महामार्गावरील बोधलेनगर परिसरातील उत्तरानगर येथे सुरू असलेली मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या उपनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि वाहनचालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांना टवाळखाेरांनी मारहाण केली. तसेच पोलिस वाहनावर दगडफेक करून या वाहनाच्या काचा फोडण्यात अाल्या. टवाळखोरांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याने आता थेट पोलिसांवरच हल्ले होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चौकाचौकात बसणाऱ्या टवाळखोरांना आवरण्यासाठी नागरिकांकडून कारवाईची मागणी हाेत अाहे. दरम्यान, याप्रकरणी पाेलिसांनी चार टवाळखाेरांना ताब्यात घेतले असून उर्वरित टवाळखाेरांचा शाेध सुरू अाहे. 


याबाबत पोलिस कर्मचारी किसन काकड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक संदीप कांबळे, पटाईत यांच्यासह काही कर्मचारी जयभवानी रोडवर गस्त घालत होते. या दरम्यान नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर पेट्रोलपंपामागील उत्तरानगर येथे मारामारीची घटना घडली. घटनास्थळी उपनिरीक्षक संदिप कांबळे हे सहकाऱ्यांसह गेले. त्यावेळी जेलरोड परिसरातील जुना सायखेडारोडवरील भारतभूषण सोसायटीतील आकाश राजेंद्र गांगुर्डे याला संशयित गणेश शेवरे, तुकाराम शेवरे, भावेश पवार, मुन्ना दोंदे, ऋषभ साळवे, तुषार पावरे, अजय गाढवे, भीम पोटिंदे हे लोखंडी हत्याराने मारहाण करीत होते. यावेळी आकाशला सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तसेच पाेलिस वाहनावर या संशयितांसह चार-पाच महिलांनी दगडफेक केली. काही पोलिसांच्या डोळ्यात मिरची फेकून त्यांना मारहाण केली. दगडफेकीत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच पोलिस वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. जखमी आकाशला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारामारी सोडविण्यासाठी गुन्हे शोधपथकाचे (डी. बी.) उपनिरीक्षक गणेश जाधव, हवालदार ए. टी. गोडसे, किरण देशमुख, प्रजित ठाकूर आले असता संशयितांनी त्यांना धक्काबुक्की सुरू केली. यात उपनिरीक्षक संदीप कांबळे यांच्या डोळ्यात पूड फेकल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर संशयितांची धरपकड सुरू केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. 

 

पाेलिस यंत्रणेलाच सुरक्षेची गरज 

पोलिस उपआयुक्तांच्या आरटीपीसीला मारहाण करण्याची घटना ताजी असताना दोन गटामध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यास गेलेल्या उपनिरीक्षकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकत त्यास मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच हे टोळके थांबले नाही तर थेट पोलिस वाहनाला लक्ष्य करत ते वाहनही त्यांनी फोडले. या प्रकाराने पोलिस यंत्रणेलाच सुरक्षेची गरज असल्याचे चित्र वादाच्या ठिकाणी दिसून अाले. 

 

दंडुका फिरवण्याची गरज : विविध सामाजिक उपक्रम राबवताना पाेलिसांनी गुन्हेगारांसह समाजातील अपप्रवृत्तीच्या विरोधात धडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक उपक्रमांना आता फाटा देत दंडुका फिरवण्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. 

 

पाेलिसांनी सामाजिक उपक्रमांसोबत सुरक्षेकडेही लक्ष द्यावे 
पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या अधिकारात असलेल्या उपनगर ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री दौऱ्यानंतर एका मनविसेच्या पदाधिकाऱ्याच्या बढाया मारण्याच्या नादात उपायुक्त, पोलिस निरीक्षक, नगरसेवक आणि अन्य पक्षाचे वरीष्ठ पदाधिकाऱ्याविरोधात घसरलेली जीभ, दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथे एटीएम फोडून २८ लाखांची चाेरी व अाता थेट पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत टवाळखाेरांची मजल गेली अाहे. चौकाचौकात बसणारे टवाळखोर, बेदरकारपणे दुचाकी चालविणारे रोडरोमिअो यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिस अद्यापही सामाजिक उपक्रम राबविण्यात मग्न आहेत. त्यामुळे आता तरी पोलिसांनी सामाजिक उपक्रमांसोबत नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी चर्चा हाेत अाहे. 

 

'खाकी'चे मनोबल खचले 
एकीकडे पोलिस प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत अाहेत. तर दुसरीकडे या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत टवाळखाेरांकडून थेट मारहाण केली जात अाहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिसांचे मनोबल खचत आहे. 

बातम्या आणखी आहेत...