आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड शहरातील कुख्यात गुन्हेगार ‘टायगर’ पोलिस चकमकीत ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - चोरी, दरोडा, खंडणी आणि दहशत माजवणे आदी गुन्ह्यात पोलिसांना हैराण करून सोडणारा कुख्यात गुन्हेगार शेरासिंघ ऊर्फ टायगर सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमाराला पोलिसांसाेबत झालेल्या चकमकीत ठार झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत त्याची झाल्याची माहिती  पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.  रविवारी रात्री साडेआठच्या सुमाराला श्रीनगर भागातील मेट्रो शूज या दुकानात शेरासिंघ उर्फ टायगर व त्याचा एक साथीदार गेले. त्यावेळी दोन-तीन कर्मचाऱ्यांना टायगरने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला. ‘हम रिधा के आदमी है’ अशी धमकी देऊन दुकानाच्या काऊंटरमधील १२ हजार रुपये रोख व दुकानातील किंमती बुटाचे जोड पळवले. हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेची माहिती  मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रात्री उशिरा   एका आरोपीला अटकही केली. परंतु मुख्य आरोपी टायगर मात्र फरार झाला.

शेतात चकमक


या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच  टायगर हा भोकर फाटा ते बारड दरम्यान  बारसगाव शिवारातील आखाड्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि पांडुरंग भारती व सहकारी त्याला पकडण्यासाठी गेले. परंतु पोलिसांना बघताच टायगरने पोलिसांच्या दिशेने रिव्हॉल्व्हरमधून तीन राउंड फायर केले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्याच्या छातीवर लागली. त्यात तो जागीच ठार झाला. 

गोळी लागून टायगर खाली कोसळल्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु त्याला रुग्णालयात आणले तेव्हा तो मृतावस्थेत होता, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. 

कुख्यात गुन्हेगार 
टायगर हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर दरोडा, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१६ मध्ये त्याने पोलिसांच्या अंगावर  ट्रक घालून त्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्नही केला. त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. त्याच्यावर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.