आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकस्थिती चांगली नसताना आणेवारी अधिक दाखवली; उत्पादन खर्च निघणे अशक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव- शेवगाव तालुक्यातील खरिपाच्या सर्व ३४ गावांची नजर अंदाज आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दाखवण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे. पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या असून काही ठिकाणी दुबार पेरणी करूनही पिके जगली नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 


शेवगाव तालुक्यात यंदा गेल्या वर्षीपेक्षाही पिकांची स्थिती वाईट असताना महसूलने जावईशोध लावत तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव, चापडगावसह शेवगाव मंडळातील जिरायती शेतीची नजरअंदाज आणेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखवली आहे. आणेवारी अधिक दाखवून प्रशासनाने शेतकऱ्यांना आणखी दुबळे बनवल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गात उमटत असून प्रत्यक्ष पीकस्थिती पाहून फेर आणेवारी घोषित करावी, अशी मागणी व्यक्त होत आहे. दरम्यान, हातचे पीक वाया गेले, तर हातभार लागावा याकरिता यंदाही परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. या पीक विम्याच्या दाव्यासाठी ही आणेवारी उपयुक्त ठरते. 


बोधेगाव परिसरातील विविध गावांची पीकस्थिती मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्केसुद्धा नाही. महसूल प्रशासनाने नुकतीच १५ सप्टेंबरला नजर अंदाज आणेवारी घोषित केली असून त्यामध्ये तालुक्यातील खरिपाच्या ३४ गावांची आणेवारी ५२ ते ५५ पैसे दाखवण्यात आली आहे. शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. प्रशासनाने सुधारित आणेवारी घोषित करावी, अशी मागणी होत आहे. त्यामध्ये ही आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी राहणार असल्याचा शेतकऱ्यांचा दावा असून ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी निघाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळाबाबतचे वेगवेगळे निर्णय लागू होऊ शकतात. परिणामी शेतकऱ्यांनाही विविध योजनांचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी काढून मदतीची आशा धुसर केली आहे. 


शेवगावचा पूर्व भाग कायम जिरायती असून यंदा पावसाने प्रदीर्घ उघडीप दिली असल्याने केलेल्या पेरण्या हातातून गेल्या आहेत. दुबार पेरणी करूनही पदरी निराशाच पडल्याने शेतकरी चिंतेत असतानाच प्रशासनाच्या या अहवालाने नाराजी पसरली आहे. वातावरणातील बदल आणि पावसाने दिलेली ओढ यामुळे बाजरी, कपाशीसह सर्वच खरीप पिकांचा उतारा १० टक्केही येणार नाही. उत्पादनात मोठी घट झाल्याने बियाण्यांसाठी झालेला खर्चसुद्धा हाती येणार नसल्याचे चित्र आहे. काही गावांमध्ये आतापासूनच टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यल्प पावसाने खरीप हंगामानंतर आता रब्बीच्या आशा बेभरवशावर पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. दरम्यान, राज्यात पैसेवारी काढण्याची पद्धत ही निजामकाळापासून एकच असल्याने याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतो. प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीवरच शासनाच्या पुढील दुष्काळी उपाययोजना अवलंबून असल्याने शासकीय लाभापासून वंचित राहण्याच्या विवंचनेने चिंताग्रस्त असलेले शेतकरी प्रशासनाच्या भूमिकेवर संतप्त आहेत. 


अशी आहे गावनिहाय आणेवारी 
अधोडी - ५२, आंतरवाली बुद्रूक - ५४, आंतरवाली खुर्द शे - ५२, बेलगाव - ५४, बाडगव्हाण - ५२, बोधेगाव - ५४, चेडे चांदगाव - ५२, दिवटे ५२, गोळेगाव - ५४, हसनापूर - ५५, कोळगाव - ५४, कोनोशी - ५४, लाडजळगाव - ५४, माळेगावने - ५५, मंगरूळ बुद्रूक - ५४, मंगरूळ खुर्द -५४, मुरमी - ५२, नागलवाडी - ५२, नजीक बाभूळगाव - ५५, राक्षी - ५२, राणेगाव - ५२, सालवडगाव - ५४, सुळे पिंपळगाव - ५२, सोनेसांगवी - ५२, शिंगोरी - ५४, शोभानगर - ५२, शेकटे बुद्रूक - ५४, शेकटे खुर्द - ५४, सुकळी - ५४, थाटे - ५४, ठाकूर निमगाव - ५४, वाडगाव - ५४, वरखेड - ५४, सेवानगर - ५२.

बातम्या आणखी आहेत...