आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादवरून उमरखेडकडे जाणारी क्रुझर जीप उलटली; 5 वर्षीय चिमुकल्याचा चेंगरून मृत्यू, चार जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औंढा नागनाथ - जिंतूर मार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली घटना, जखमींवर उपचार सुरू

हिंगोली - औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील लिंबाळा पाटीजवळ औरंगाबाद येथून उमरखेडकडे जाणारी क्रुझर जीप उलटून पाच वर्षाचा बालक ठार तर चौघे जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे तीन वाजता घडली आहे. या अपघातातील जखमी झालेल्या चौघांवर औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील दहा जण एका क्रुझर जीपने (क्र. एम एच 20 डीजे 8849) औरंगाबाद येथून औंढा नागनाथ मार्गे उमरखेड येथे नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी जात होते. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची क्रुझर जीप औंढा नागनाथ ते जिंतुर मार्गावर लिंबाळा गावाजवळ आली असतांना रस्त्यावरून अचानक रानडुकरांचा कळप आला. त्यामुळे चालकाने ब्रेक लावले. त्यानंतर चालकाला वाहनावर ताबा मिळवता आला नाही. त्यामुळे सदर जीप रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात जीप मधील गणेश अवधुत खरुसकर (5) हा जीप खाली चेंगरुन ठार झाला. तर जीप मधील तनुजा जाधव, जयश्री जाधव, राजू काळे, प्रवीण रुपनर हे जखमी झाले.

 
जीप उलटल्याचा आवाज आल्यानंतर लिंबाळाचे गावकरी मदतीसाठी धावले. गावकरी व जीप मधून बाहेर पडलेले विलास खरुसकर, शालिक जाधव, उत्तम जाधव,  प्रकाश पवार यांच्या मदतीने जीप उभी करून जीप मधील इतर जखमींना बाहेर काढले. या अपघातातील जखमींना पांडुरंग नागरे यांच्या खाजगी रुग्णवाहिकेद्वारे औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औंढानागनाथ चे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.