आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तज्ज्ञांनी सुरक्षित म्हटलेला पूल पडलाच कसा? काय म्हटले होते स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - दाेन वर्षांपूर्वी २३ जणांचे बळी घेणाऱ्या एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांची दुरवस्था समोर आली होती. त्यातून काही बोध घेण्याअगोदरच वर्षभरानेच अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील गोखले पूल पडला. यानंतर पुन्हा एकदा पुलांची दुरवस्था दूर करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि रेल्वेच्या अभियंत्यांनी मुंबईतील ४४५ पुलांचे ऑडिट केले होते. त्यात गुरुवारी सीएसटीसमाेरील पडलेला हिमालय (कसाब) पूल सुरक्षित असल्याचे म्हटले होते. जर पूल सुरक्षित होता तर पडला कसा, असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे.   
काेकणातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल पडल्याच्या घटनेनंतर नगरसेवकांनी मागणी केल्याने मुंबई मनपाने या शहरातील २९६ पुलांची संरचनात्मक पाहणी करण्यासाठी सल्लागार नेमले. एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने रेल्वेपुलांची पाहणी सुरू केली. परंतु त्यांनी मुंबई मनपाच्या अखत्यारीतील पुलांची पाहणीच केली नाही. गोखले पूल पडल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे व मनपाने पुलांच्या संरचनात्मक पाहणीस सुरुवात केली. 


त्या वेळी मशीद बंदर येथील यलो गेट पूल, मरीन लाइन्स येथील एमके रोड चंदनवाडी, हंसा भुगरा मार्ग पाइप पूल, एसबीआय कॉलनी पूल, गांधीनगर कुरार गाव येथील पूल, गोरेगाव येथील वालभात नाला पूल, दहिसर येथील रामनगर चौक पूल, एसव्हीपी रोड पूल, आकुर्ली रोड पूल आणि विठ्ठल मंदिर पूल, साकीनाका येथील हरी मशीद पूल, टिळकनगर येथील रेल्वे पादचारी पूल आणि घाटकोपर येथील बर्वेनगर पूल हे १४ पूल अति धोकादायक ठरवण्यात आले.  ते पाडून नव्याने बांधणे आवश्यक आहेत. तसेच १७६ पुलांची काही प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. मुंबई मनपाने आगामी आर्थिक वर्षात मुंबईतील पुलांसाठी ६०० कोटींची तरतूद केली आहे. आयआयटी मुंबईतील तज्ज्ञ व रेल्वे अभियंत्यांच्या समितीने ४४५ पुलांपैकी काही पूल अत्यंत धोकादायक असून ते पाडून नव्याने बांधण्याचा सल्ला दिला होता, तर काही पुलांची दुरुस्ती अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले होते. गुरुवारी पडलेल्या पुलाचेही त्या वेळी ऑडिट करण्यात आले होते आणि तो सुरक्षित असल्याचे सांगितले होते.    


काय म्हटले होते स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये 
गतवर्षी जुलैत अंधेरी रेल्वे स्थानकालगत असलेला पादचारी पूल कोसळल्यानंतर पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. परिणामी मुंबईतील सर्व पादचारी पूल, सबवे आणि स्कायवॉक यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ३१४ पुलांचे ऑडिट झाले. त्याच्या अहवालानुसार ३१४ पैकी १४ पूल अतिधोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्याने ते पाडून नवे बांधण्याची शिफारस झाली. ४७ पुलांमध्ये मोठ्या दुरुस्तीची व १७६ पुलांमध्ये किरकोळ दुरुस्तीची शिफारस झाली. विशेष म्हणजे ३१४ पैकी फक्त ७७ पादचारी पूल सुस्थितीत असल्याचे  अहवालात नमूद केले होते. 


पूल ‘सुस्थिती’त असल्याचा आॅडिटच्या अहवालात शेरा
मनपाने जानेवारी २०१९ मध्ये ६५ कोटींची तरतूद करून ५० पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र गुरुवारच्या घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिटच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पादचारी पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला आहे. ६ महिन्यापूर्वीच्या या अहवालानुसार संबंधित पूल हा ‘चांगल्या स्थितीत’ असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या पुलाची जुजबी दुरुस्ती करून सुशोभीकरणही झाले होते. तरीही पूल कोसळल्याने सदोष स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या डी.डी.देसाई असोसिएट्स प्रा.लि. या कंपनीवर ठपका ठेवून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.


रेल्वेत पूल निरीक्षकाचे पदच अस्तित्वात नाही
अंधेरी व एल्फिन्स्टनच्या घटनेनंतर आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडे पुलाच्या तपासणी प्रक्रियेबाबतची माहिती मागितली. ऑगस्ट २०१८ मध्ये आलेल्या उत्तरानुसार उपनगरीय रेल्वे मार्गांवर पादचारी वा इतर पुलांच्या सरक्षिततेची तपासणी करण्यासाठी निरीक्षकाचे पदच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले.


स्ट्रक्चरल ऑडिटसाठीच्या मानकांचे पालन झाले?
सुप्रसिद्ध वास्तुविशारद व बांधकाम तज्ज्ञ शशी प्रभू म्हणाले, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत असून त्यासाठी जागतिक दर्जाची मानके निश्चित आहे. मात्र ते त्या शास्त्रशुद्ध पद्धतीनेच होते का हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा आपल्या व्यवस्थेत नाही. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन होण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...