आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी रुग्णालयात ६५ लाखांच्या थकबाकीमुळे सीटी स्कॅन बंद; गरिबांचे हाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- केवळ मराठवाडाच नव्हे, तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या घाटी रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रे ६५ लाखांच्या थकबाकीसाठी आठ दिवसांपासून बंद पडली आहेत. एवढी रक्कम घाटी प्रशासनाच्या तिजोरीत नसल्याने यंत्रे तातडीने सुरू होणे अशक्य आहे. दुसरीकडे आठपैकी सात व्हेंटिलेटर्स बंद पडले असून दोन महिन्यांपासून पोलिओ डोसचा एक थेंबही नाही. काविळीची लसही संपण्याच्या मार्गावर आहे. 


घाटीमध्ये ६४ स्लाइसचे एक आणि ६ स्लाइसचे एक सीटी स्कॅन अशी दोन यंत्रे आहेत. ६४ स्लाइसच्या यंत्रासाठी २०१५ मध्ये ७० लाखांची ट्यूब खरेदी झाली. ती बंद पडल्याने यंत्र ठप्प झाले. या यंत्राचे आयुष्य संपल्याने २६ लाखांची थकबाकी देऊन नवे यंत्र खरेदी करावे लागेल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. ६ स्लाइसच्या यंत्राची ट्यूब ३० लाखांची असून देखभाल दुरुस्तीपोटी ९ लाखांची थकबाकी आहे. सर्जिकल विभागात ट्रॉमा केअरमध्ये ८ पैकी ७ व्हेंटिलेटर्सही निकामी झाले आहेत. चार दिवसांत पुरवठा सुरळीत होण्याचा उपसंचालकांचा दावा : आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज्यभरात लसींचा तुटवडा आहे. मात्र, आजच २० हजार पोलिओ ओरल व्हॅक्सिनचा पुरवठा मनपा आरोग्य विभागाला केला आहे. येत्या ४ दिवसांत पुरवठा सुरळीत होईल. घाटीला दरमहा १ हजार लसींची आवश्यकता असते. १२०० लसींची मागणी केल्याची माहिती लसीकरण विभागाचे इन्चार्ज डॉ. संकेत बारी यांनी दिली. 


देखभाल दुरुस्तीचा निधी मिळत नाही
यंत्रसामग्रीच्या देखभाल दुरुस्तीसाठी आम्ही २०१८-१९ साठी ३ कोटी ६७ लाखांची मागणी केली होती. त्यापैकी १ कोटी ९५ लाख मिळाले. यंदा ५ कोटी १८ लाखांची मागणी केली आहे. ती मिळाल्यास यंत्रे दुरुस्त होतील, असे घाटी रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रकाश देहाडे यांनी सांगितले. 


महिनाभरापासून नाहीत 'दो बूंद जिंदगी के' 
दरम्यान, घाटी रुग्णालयातील पोलिओचा ओरल डोस ११ ऑगस्टपासून संपला आहे. वारंवार मागणी करूनही मनपाकडून साठा उपलब्ध झाला नाही. काविळीची लसही १० दिवस पुरेल इतकीच शिल्लक आहे. घाटीच्या बाह्यरोग विभागात दररोज सुमारे ४० ते ६० बालके लसीकरणासाठी येतात. स्त्रीरोग व प्रसूती विभागात दररोज जन्मणाऱ्या ७० जे ८० बाळांना झीरो लस ७२ तासांच्या आत देणे अत्यावश्यक आहे. मात्र, महिनाभरापासून ही लस संपल्याची धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली. घाटीत हिपॅटायटिस, बीसीजी या महत्त्वाच्या लसी दिल्या जातात. त्यातील हिपेटायटिसची लसही १५ दिवसांपू्र्वी संपली. ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर डॉ. येळीकर यांनी लसीसाठी मनपाकडे पाठपुरावा करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. 


व्हेंटिलेटर्स बंद 
घाटीतील १० खाटांच्या अतिदक्षता (ट्रॉमाकेअर सेंटर) विभागातील ८ पैकी ७ व्हेंटिलेटर्स बंद पडले असल्याचेही सोमवारी निदर्शनास आले. दरवर्षी प्रस्ताव देऊनही नवी यंत्र खरेदी होत नाही. त्यात आधीच्या यंत्रांनी मान टाकल्याने नवेे आव्हान डॉक्टरांपुढे उभे ठाकले आहे. 


दोन सीटी स्कॅन यंत्रे पाइपलाइनमध्ये

घाटीसाठी डीपीसीच्या निधीतून एका, तर शिर्डी संस्थानकडून एका सीटी स्कॅनची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र, हाफकिन्सकडून यंत्र खरेदी करा, या फर्मानामुळे शिर्डी संस्थानकडून मिळणारे यंत्र अडकले आहे. 


काळानुसार नव्हे, रुग्णसंख्येवर आयुष्य 
रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर यांनी सांगितले की, घाटीतील सर्व महत्त्वाची यंत्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्यांनी १० वर्षे यंत्रे चालतील, असे म्हटलेले असते. पण यंत्राचे आयुष्य वर्षांच्या नव्हे, रुग्णसंख्येच्या तुलनेत मोजले पाहिजे. ६४ स्लाइस सीटी स्कॅनला २०१५मध्ये ट्यूब लावली. तिचे आयुष्य १० कोटी मिलीअॅम्पियर प्रति सेकंद इतके होते. आम्ही १६ कोटी मिलीअॅम्पियर प्रति सेकंद वापर केला. 


वर्षाभरापूर्वीच संपले आयुष्य 
घाटीत ६ वर्षांपूर्वी सिलर कंपनीच्या व्हेंटिलेटर्सची (एक व्हेंटिलेटर २ ते २५ लाख रुपयांपर्यंत असते.) खरेदी झाली होती. त्यांचेही आयुष्य संपले आहे. शिवाय दोन्ही एसी म्हणजे वातानुकूलन यंत्रेही बंद पडली आहेत. नवीन एसी खरेदीची सूचना वर्षभरापू्र्वीच सिलर कंपनीने केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...