आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील सांस्कृतिक-वैचारिक फाळणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचार, दहशतवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विचारवंतांच्या हत्या अशा कोणत्याही विषयावर सरकारला सवाल केले, तर ‘तेव्हा कोठे होता राधासुता तुझा धर्म?’ अशा थाटात आजकाल गप्प बसवले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच ४९ प्रतिभावंतांनी पत्र लिहून देशातील वाढत्या झुंडबळींच्या घटना रोखण्याची मागणी करत निषेध व्यक्त केला होता. या पत्राला ६१ नामवंतांनी उत्तर दिले असून केवळ मोजक्या प्रकरणांचा निषेध आणि विरोध करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ४९ नामवंतांत मणिरत्नम, अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, अपर्णा सेन, शुभा मुद्गल तसेच अमित चौधरींसारखा लेखक यांचा समावेश आहे. तर जेव्हा नक्षलवादी आदिवासींना लक्ष्य करतात किंवा काश्मीरमधले अतिरेकी शाळा जाळण्याचे आदेश देतात तेव्हा हे लोक कुठे होते, असा सवाल करणाऱ्या ६१ जणांमध्ये कंगना राणावत, मधुर भांडारकर, विवेक अग्निहोत्री, प्रसून जोशी, खासदार व नृत्यांगना सोनल मानसिंग प्रभृतींचा समावेश आहे. मात्र यामुळे बॉलीवूडमध्ये स्पष्टपणे दोन गट पडले आहेत. 


२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘उरी’ हा चित्रपट आला आणि भाजपने राष्ट्रभावना जागवण्यासाठी त्याचे अनेक शो आयोजित केले. भाजपवादी विवेक ओबेरॉयने मोदी यांच्यावरील जीवनपटात काम केले. अक्षय कुमारने ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘पॅडमॅन’ यासारख्या मोदी सरकारचा मेसेज देणाऱ्या चित्रपटांत काम केले असून तो या मंडळींच्याच विचारांचा आहे. विवेक अग्निहोत्रीने ‘द ताश्कंद फाइल्स’ हा चित्रपट दिग्दर्शनात केला असून अनेकदा फेक न्यूजचा प्रचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो उजव्या विचारांचा, अर्थातच मोदी समर्थक असून ‘मी टू’ चळवळीच्या वेळी त्याने स्वरा भास्करला लाखोली वाहिली होती. ६१ जणांपैकी प्रसून जोशीला रालोआ सरकारने सेन्सॉर बोर्डचा अध्यक्ष केले आहे आणि मोदींबरोबर त्याने केलेला एक इव्हेंटही सर्वश्रुत आहे. पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे, असे कंगनाचे मत असून उदारमतवादी लोक हे ‘फॅनेटिक्स’ असल्याचे तिचे मत आहे. कराचीमधील एका सांस्कृतिक सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल कंगनाने शबाना आझमीवर ‘देशद्रोही’ असा शिक्का मारला होता. मधुर भांडारकरने ‘इंदू सरकार’ काढला होता. अनेक लोक मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करतात आणि तेच लोक त्या सरकारकडून अनुदान घेतात, असे उद्गार मधुरने काढले होते. त्या वेळी ‘योगीजी हे उ. प्र.चे मालक नाहीत,’ असा सणसणीत टोला दिग्दर्शक अनुराग कश्यपने लगावला होता. बॉलीवूडमधील अनुपम खेर आणि परेश रावल हे तर मोदींचे पाठीराखे म्हणून प्रसिद्धच आहेत. अशोक पंडित हे ‘दि ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचे सहनिर्माते असून तेही बॉलीवूडमधील कट्टर मोदी समर्थक आहेत. सरकारच्या बाजूने पत्रक काढणाऱ्यांमध्ये अशोक पंडितांबरेबरच पल्लवी जोशी यांचाही समावेश आहे. सरकारने त्यांना एफटीआयआयवर नियुक्त केले होते. 


‘मी फाळणीचा निर्वासित असून बुद्धिवाद्यांच्या भीतीच्या छायेखालीच सतत वावरलो आहे. त्यांचं आलिंगनही मला सर्पदंशाप्रमाणे वाटतं,’ अशी टिप्पणी दिग्दर्शक शेखर कपूरने केल्यानंतर, ‘शेखर, तुला श्याम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन की रामचंद्र गुहा यापैकी कुणी दंश केला? तुला चांगल्या मानसोपचाराची गरज आहे,’ असा टोला गीतकार जावेद अख्तर यांनी लगावला. वास्तविक उपरोल्लिखित व्यक्ती तसेच शुभा मुद्गल, मणिरत्नम, कंकणा सेन, अनुराग, आशिष नंदी हे अत्यंत संवेदनाक्षम कलावंत-विचारवंत आहेत. त्यांच्यापैकी कोणीही एखाद्या लाभासाठी वा पदासाठी भूमिका घेणारे नाही. अदूरने तर ‘मुखामुखम’ या चित्रपटातून साम्यवादी चळवळीवरही प्रखर भाष्य केले होते. अमित चौधरींसारख्या कादंबरीकाराने डी. एच. लॉरेन्सवर पीएचडी केली आहे. लिटररी ॲक्टिव्हिझमवर ते दरवर्षी चर्चासत्रे भरवतात. तेव्हा ही सारी मंडळी मिळून सरकारविरुद्ध काही कट रचत आहेत असे म्हणता येणार नाही. शिवाय अमुक-तमुक वेळी तुम्ही आवाज का उठवला नाही आणि तुम्ही सिलेक्टिव्ह आहात, असा आरोप कोणीही कोणाविरुद्ध करू शकतो. अखलाकचा बळी घेतला गेल्यानंतर अनेक साहित्यिकांनी आपले सरकारी पुरस्कार परत केले. तेव्हा त्याची टर उडवली गेली. जूनमध्ये तबरेज अन्सारीला चोरी केल्याबद्दल ठार मारण्यात आले. त्याविरुद्ध बुद्धिमंतांनी आवाज उठवला. कोणताही कलावंत वा विचारवंत हा नेहमीच उपेक्षित वर्गाच्या बाजूने बोलत असतो. बहुसंख्याकांपेक्षा अल्पसंख्याकांची दुःखेच त्याला अधिक महत्त्वाची वाटत असतात. 


इंदिरा गांधींची एकाधिकारशाही डाचत होती तेव्हा अमोल पालेकर यांनी आणीबाणीचा निषेध म्हणून ‘जुलूस’ हे नाटक केले किंवा अल्काझींनी दिल्लीत ‘हिरोशिमा’ हे अर्थपूर्ण नाटक केले होते. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जयप्रकाशजींची ‘स्वगत’ ही डायरी प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी पु. ल. देशपांडे यांनी तसेच दुर्गा भागवतांनी इंदिराजींच्या एकाधिकारशाहीविरुद्ध आवाज उठवला होता. कादंबरीकार सोल्झेनित्सिन, कवी फैज अहमद फैज, नाटककार हावेल यांनी दडपशाही राजवटींविरुद्ध साहित्यातून टीका केली. आपल्याकडे ‘मुल्क’ आणि ‘आर्टिकल 15’ मधून धार्मिक, जातीय हिंसाचारावर भाष्य केले गेले.  एकेकाळी ‘मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी मला न साहे,’ असे केशवसुतांनी म्हटले होते. आज अल्पसंख्य, दीनदुबळ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. मात्र त्याविरुद्ध कलावंत व बुद्धिमंतांनी आपल्या साहित्यकृतीतून आवाज उठवल्यास तो अधिक प्रभावी ठरेल, अन्यथा केवळ पत्रके काढल्यास मोदी त्याचा फायदाच उठवतील. नाहीतरी खान मार्केट गँगचा त्यांना तिटकाराच आहे. शिवाय ‘जनता माझ्याबरोबर आहे ना,’ असाच प्रधानसेवकांचा पवित्रा आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...