Home | Sports | From The Field | Curiosity for the opening of the cricket World Cup 2019

विश्वचषक २०१९ च्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता; ओव्हल मैदानावर विश्वचषक २०१९ चे रणशिंग फुंकले जाणार

विनायक दळवी | Update - Apr 03, 2019, 10:58 AM IST

स्पर्धेच्या एकूण ४८ सामन्यांच्या १४८ देशांमधून (६ खंडांमधून) ३० लाख क्रिकेटरसिकांनी तिकिटांची मागणी केली आहे

 • Curiosity for the opening of the cricket World Cup 2019

  मुंबई - लंडन ऑलिम्पिक्सच्या (२०१२) आयोजनापासून ब्रिटनने आपल्या पारंपरिक रूढी आणि कल्पनांना शह दिला असून जागतिक स्तरावरील प्रत्येक उपक्रमाला आधुनिकतेचा स्पर्श करण्यास सुरुवात केली आहे. लंडनच्या ‘ट्राफाल्गर स्क्वेअर’ परिसरातील ‘द मॉल’ आणि पाठीमागे दिसणाऱ्या बकिंगहॅम पॅलेसच्या विहंगम दृश्यासोबत यंदाच्या विश्वचषक २०१९ क्रिकेट स्पर्धेच्या विशेष उद्घाटन सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  ३० मे रोजी लंडनच्या ओव्हल मैदानावर यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीत विश्वचषक २०१९ चे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्याआधीच्या पूर्वसंध्येला बकिंगहॅम पॅलेसच्या साथीने उद्घाटन सोहोळा रंगणार आहे. लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच ते सहा अशा एका तासाच्याच, परंतु आटोपशीर उद्घाटन सोहोळ्यात डान्स, म्युझिक, मस्ती यांची रेलचेल असेल. क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांच्या हस्ते विजेत्यांचा होणारा गौरव हे सोहळ्याचे आकर्षण असेल.


  यासंदर्भात माहिती देताना स्पर्धा संचालक स्टिव्ह एलवर्थी म्हणाले, ‘यंदाची विश्वचषक स्पर्धा किती आगळी वेगळी आहे. त्याची झलकच या सोहळ्याच्या निमित्ताने पाहावयास मिळणार आहे. चार हजार प्रेक्षक सुदैवी आहेत, त्यांना थेट उद्घाटन सोहोळा पाहण्याचे भाग्य लाभणार आहे. जगभरातील क्रिकेट रसिकांचा विचार करून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

  विश्वचषक २०१९ स्पर्धा तब्बल ४५ दिवस रंगणार आहे. ब्रिटनमधील विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीचाही हा उच्चांक आहे. स्पर्धेच्या एकूण ४८ सामन्यांच्या १४८ देशांमधून (६ खंडांमधून) ३० लाख क्रिकेटरसिकांनी तिकिटांची मागणी केली आहे.

  अशा या तमाम विश्वाचे लक्ष असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळाही तेवढाच दिलखेचक असेल, अशी ग्वाही रॉयल पार्क्सचे अॅलून मेनवरिंग यांनी दिली आहे.

  ३० मे ते १४ जुलैदरम्यानच्या या विश्वचषकाचे सामने इंग्लंडमधील कार्डिफ, ब्रिस्टल, टॉन्टन, साउदॅम्प्टन, एजबॅस्टन, हेडिंग्ले (लीड्स), लॉर्ड््स (लंडन), ओव्हल(लंडन), डरहॅम व ट्रेंट ब्रिज (नॉटिंगहॅम) येथे होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणारे १० संघ प्रत्येकासोबत खेळणार असल्यामुळे सामन्यांची संख्या (४५) वाढली आहे. २ उपांत्य व एक अंतिम सामना अशी एकूण संख्या ४८ होणार आहे. इंग्लंडने यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ व १९९९ या वर्षी विश्वचषक स्पर्धांचे आयोजन केले होते.

  उद्घाटन सोहोळ्याच्या ४ हजार तिकिटांचे वाटप मतपत्रिकेद्वारा करण्यात येणार आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता हे मतदान सुरू होईल व १ मे रोजी थांबेल. भाग्यवान क्रिकेट रसिकांच्या नावांची घोषणा ७ मे रोजी होईल. प्रत्येक अर्जदाराला २ विनामूल्य तिकिटेच मिळतील.

Trending