आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभरात सध्या अघोषित आणीबाणी; संसदीय व्यवस्थांचे, संस्थांचे सरकारकडून अवमूल्यन: यशवंत सिन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देशात अघोषित आणीबाणी आहे, संसदीय व्यवस्थांचे, संस्थांचे सरकारकडून अवमूल्यन केले गेले आहे, सर्वांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यात येत आहे. राजकीय विरोधकांना बदनाम करून संपवण्यात येत आहे. या अघोषित आणीबाणीविरुद्ध लढले पाहिजे आणि देश जिवंत आहे हे दाखवून देण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी पुण्यात केले. ' मोदींवर बोलण्याऐवजी मुद्द्यांवर बोलले पाहिजे. पुण्याने देशाला दिशा द्यावी आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यात पुढाकार घ्यावा, नागरिक म्हणून आता गप्प राहता कामा नये. सव्वाशे कोटी जनतेने मनात आणले, तर १९७७ सारखे निकाल येऊ शकतात, असेही ते म्हणाले. क्रांतिदिन आणि युवक क्रांती दलाच्या १७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी', 'युवक क्रांती दल' आणि 'प्रफुल्लता प्रकाशन' यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


यशवंत सिन्हा म्हणाले, आणीबाणीविरोधी आंदोलनात डॉ. सप्तर्षी यांची भूमिका महत्त्वाची होती. आज पुन्हा तशीच परिस्थिती आहे. मागील वेळच्या आणीबाणीला संविधानाचा आधार होता. पण आता चतुराईने अघोषित आणीबाणी राबवली जात आहे. संसदीय व्यवस्था, तपास व्यवस्था, माध्यमे ताब्यात घेऊन नाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताच्या आणीबाणीत धर्मवाद (सांप्रदायिकता ) आहे. अनेक व्यवस्था शरण गेल्यासारखी अवस्था आहे. कॅबिनेट व्यवस्था 'ग्रुप ऑफ ऑर्डर्ली' झाली आहे. एकच जण निर्णय घेत आहे, त्याचे श्रेय अपश्रेय घेत आहे. पंतप्रधानांसमोर माध्यमांनी लोटांगण घातले आहे. दुसऱ्याच्या 'मनची बात' ऐकायला पंतप्रधानांना वेळ नाही. पुस्तकाविषयी माहिती देताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, '१९७० च्या दशकात अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून तुरुंगात आलेले अनेक अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबत चे लेखन 'येरवडा विद्यापीठातील दिवस या पुस्तकात आहे.' डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, ' येरवडा विद्यापीठातील दिवस' हे पुस्तक युक्रांद कार्यकर्त्यांसाठी पाठयपुस्तक आहे. व्यवस्थेच्या प्रतिनिधी असणारे मंत्री, पोलिस, जेलची भीती घालवण्याचे काम या पुस्तकाने केल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...