आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेतून उतरताना तरूणाचा ताेल गेला; दाेन्ही पाय कापले; जळगावातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव रेल्वे स्थानकावर न थांबणाऱ्या धावत्या रेल्वेतून उतरताना तोल गेल्याने तरुणाचे दोन्ही पाय कापल्या गेल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर घडली. या घटनेनंतर तरुण जवळपास १५ मिनिटे प्लॅटफॉर्मवर विव्हळत होता. परंतु, संवेदनाहीन नागरिकांनी त्यास मदत न करता केवळ अापल्या मोबाइलमध्ये फोटो काढले. लोहमार्ग पोलिसांनी तरुणास खासगी रुग्णालयात दाखल केले असून या तरुणाची प्रकृती चिंताजनक अाहे. 


रावेर तालुक्यातील गाते येथील कुणाल नीळकंठ तायडे (वय १९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. कुणाल हा शिक्षणानिमित्त जळगावातील वाल्मीकनगरात बहिणीकडे राहतो. तो स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करीत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री रेल्वेच्या परीक्षेसाठी तो नाशिक येथे गेला होता. मेहुणे नीलेश कोळी यांनी त्याला बुधवारी रात्री रेल्वे स्थानकावर सोडले होते. गुरुवारी दुपारी त्याने नाशिक येथे पेपर दिला. परतीच्या प्रवासावेळी तो जळगावला न थांबणाऱ्या रेल्वेत चुकून बसला होता. ही रेल्वेगाडी जळगाव स्थानकावर आल्यानंतर गती कमी झाली होती. त्यामुळे कुणाल याने उतरण्याचा प्रयत्न केला. यातच तोल गेल्यामुळे तो थेट रेल्वे रुळावर पडला. या अपघातात त्याचे दोन्ही पाय कापले गेले.


रुग्णालयात अाक्राेश 
कुणालची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. जळगावातील विवाहित बहिणीकडे राहून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या कुणालवर या घटनेमुळे अत्यंत वाईट प्रसंग ओढवला अाहे. घटनेची माहिती त्याच्या नातेवाइकांना कळवल्यानंतर त्यांनी रुग्णालयात आक्रोश केला. 

बातम्या आणखी आहेत...