आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅलेजरोडवर युवतींच्या दुचाकीला कारने कट; मित्रांना जबर मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एकीकडे शहरात निर्भया पथकाकडून टवाळखोरांवर धडक कारवाई सुरू असताना काॅलेजरोड, गंगापूररोडवर मात्र टवाळखोरांनी उच्छाद मांडला आहे. छेडछाडीचे प्रकार घडत असतानाच टवाळखोरांनी युवतींच्या दुचाकीचा पाठलाग करत कारने कट मारल्याची घटना घडली. युवतींच्या मदतीसाठी आलेल्या मित्रांनाही या टवाळखोरांनी बेदम मारहाण केली. हॉलमार्क चौकात हा धक्कादायक प्रकार घडला. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

पोलिसांनी दिलेली माहिती आणि एका पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी साडेसात वाजता ती दुचाकीने मैत्रिणीसोबत हाॅलमार्क चौकातून राजीव गांधी भवनकडे जात असताना संशयित भुवेश बागूल, रोहित गायकवाड, नवाज शेख, राकेश चौहान यांनी ह्युंडाई कारने भरधाव वेगात पाठीमागून येऊन हेतुपुरस्सर दुचाकीला कट मारला. यात दुचाकी खाली पडल्याने दोघी रस्त्यावर पडल्या. घडलेला प्रकार पाहून काही मित्रांनी दोघींना मदत केली. या मित्रांनी 'कट का मारला', असा जाब या संशयितांना विचारला असता संशयितांनी त्यांना बेदम मारहाण केली. पीडित युवतीने मित्राला सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी तिलाही धक्का देऊन खाली पाडत मारहाण केली व विनयभंग केला. मारहाणीचा हा प्रकार परिसरातील काही नागरिकांनी बघितला व त्यांनी तत्काळ पाेलिसांच्या निर्भया पथकाला ही माहिती कळवली. त्यानंतर पथक तत्काळ दाखल झाले. घडलेल्या प्रकाराने गंगापूर पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त होत आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात खमक्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

 

पोलिसांचे टवाळखोरांना अभय 
गंगापूर पोलिसांकडून टवाळखोरांवर कारवाईची अपेक्षा असताना वरिष्ठ निरीक्षकांसह गुन्हे शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांकडून नावापुरती गस्त होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वास्तविक, रस्त्यावर टवाळखोरांवर धडक कारवाई करणे अपेक्षित असताना वरिष्ठ अधिकारी पोलिस वाहनात बसून ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे सूचना देण्यातच धन्यता मानत असल्याने ही बाब टवाळखोरांच्या पथ्यावर पडली असल्याचे बाेलले जात आहे.