Magazine / सायकल

रूमीने विचारले, "क्या जी अम्मी ?'

Sep 01,2019 12:04:00 AM IST

आज रविवार. नाश्त्याला रूमीचा आवडता मेन्यू होता. पावभाजी! रूमी खुशीत होती. अब्बूबरोबर पाव आणायला तीही गेली होती. ताजे कोवळे लुसलुशीत पाव हातात आल्याबरोबर ती मनोमन सुखावली. घरी आल्यानंतर पाहिले तर अम्मीने दस्तरख्वान अंथरून ठेवलेले. गरमागरम वाफाळती भाजी आणि मऊशार पाव रूमीने पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ली. नाश्ता झाल्यावर अम्मी म्हणाली, "आज छुट्टी हय. खेलनेकाबी अन् आब्यासबी कर्नेका. गर्दन दालके बैटू नको नुस्ता किताबमें. जरा भायरकी दुन्याबी समझने हुना. नुस्ता आब्यास आब्यास कर्नेका नै.'


याला कारणही तसं होतं. रूमीला आपला घरचा अभ्यास अपूर्ण राहिलेला अजिबात आवडायचं नाही. पर्फेक्ट सगळा अभ्यास पूर्ण झाल्यावरच ती खेळाचा किंवा फिरण्याचा वगैरे विचार करू शकायची. परंतु अभ्यास एवढा असायचा की तो संपता संपता दुसऱ्या दिवशीच्या शाळेची वेळ यायची आणि खेळणं किंवा समवयीन मैत्रिणींना भेटणं, त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, हुंदडणं, फिरणं राहूनच जायचं. असाच आख्खाच्या आख्खा आठवडा जायचा पण शाळा, घरचा अभ्यास, खाणंपिणंझोपणं, आवरणं, शाळा या चक्रातून रूमीची सुटका काही व्हायची नाही. मग अम्मीच तिला लाडात येऊन म्हणायची, "बस कर रे मेरे बच्चे. जा. जरा पाउ मोक्ले करके आ भायर जा के. केत्ता टेन्शन लेंगी वू उतारेका?' पण नाही! रूमी ऐकेल तर शपथ! तिची मान अवघडून यायची. हाताची बोटे दुखून यायची. तरी सगळा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय तिला चैन पडायची नाही.


नाही म्हणता, अब्बूच्या लक्षात हे रूमीचं अभ्यास म्हणजे थोडक्यात लिखाण प्रकरण आल्यानंतर त्याने तिच्या मॕडमशी या भरमसाठ लिखाणावरून वादही घातला. मॕडमचे बोलणे असे होते, की ह्या नवीन पिढीच्या आणि आपल्या वेळच्या शिक्षणात जमीनअस्मानाचा फरक आहे. जो अभ्यासक्रम आपण पाचवीत शिकलो, ते आज दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला वर्षभरात पूर्ण करावा लागतो. तेव्हा आपल्यावेळी जी रट्टामार पद्धत होती तशी रखडारखडीची प्रोसिजर आता नाही. तेव्हा एखादे प्रकरण लवकर शिकून हातावेगळे व्हावे, त्याचबरोबर जलद आणि जास्तीत जास्त लिखाणाचीही सवय आतापासून व्हावी म्हणून घरचा अभ्यास जास्त असतो. यावर अब्बूंनी मॕडमशी अपेक्षित वाद घातलाच की अभ्यास चुकवणारे कसाही चुकवतातच, परंतु जे प्रामाणिक आहेत त्यांना भरमसाठ लिखाणामुळे घरी आल्यानंतरही डोके वर काढायला क्षणाची उसंत मिळत नाही. यावर मॕडमनी यापुढे या मुद्द्याचा विचार करू वगैरे बोलून अब्बूंची तात्पुरती बोळवण केलीच.


यानंतर घरी अम्मी अब्बूंनी चर्चा करून ठरवले की रविवारचा दिवस पूर्णपणे खेळाचा दिवस म्हणून ठेवायचा. या दिवशी रूमीला आवडते ते सगळं खायला प्यायला तर करायचेच, शिवाय जास्तीत जास्त वेळ ती बाहेर खेळायला, फिरायला, हुंदडायला कशी जाईल हे बघायचे.
आणि या मुद्द्याचा विचार करत असता अब्बूला सुचली सायकल! अब्बूने मग एक दिवस अचानकच सायकल आणून तिला अनपेक्षित धक्का दिला. आणि मग तिच्याकडून दर रविवारी सायकल चालवायचे कबूल करून घेतले. रूमी खूश होतीच. जरी आठवडाभर तिला सायकल जास्त फिरवता यायची नाही, तरी रविवारी मात्र ती ग्राउंडवर मनसोक्त सायकल फिरवायची. मैत्रीणींबरोबर हसायची, खेळायची, गप्पा मारायची.
त्यामुळेच आज अम्मीने तिची आवडती पावभाजी खाऊ घालून तिला हे सुनावले. वर अजून अम्मी म्हणाली, "एदेक रूमी, तुमें ग्राउंडपरच सायकल फिराते ना? व्हाके व्हाच. अन् आबी तुम्नां सायकलबी आच्ची चलाने आती. तो आजशे एक नवीन चीज कर्नेकी.'


रूमीने विचारले, "क्या जी अम्मी ?'
अम्मी म्हणाली, "तुमें आबी उप्परका चौक हय ना, व्हातक राउंड मारके आनेका. सम्जा ?'
रूमीने डोळे मोठे करून ओठांचा चंबू करत विचारले, "उदर उप्परके चौकतक? येत्ते लंबा ? उदर रस्तेपर केत्तेसारे गाड्या आस्ते? मजे डर लग्ता.'
अम्मीने तिला जवळ घेतले आणि म्हणाली, "डर लग्ता सो मजे मालूम हय. कर्केच बोल्ती, डेयरिंग कर्नेका. जानेका. कुच नै हुता. आप्ली साइड छोडनेकी नै, येत्ता ध्यान्में रखनेका. बस.'

रूमी तयार झाली. तिने निर्धार केला. मैत्रिणीलाही सोबत येण्यासाठी तयार केले आणि दोघी सायकलवर स्वार झाल्या. थोडं घाबरलेपण, थोडे कुतूहल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. सायकली चालू लागल्या. दहा मिनिटांनंतर दोन्ही सायकली येताना दिसल्या. अम्मी खाली रस्त्यावर एका बाजूला थांबून वाटच पाहात होती. दोघी आल्या. पण आता त्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते. अम्मीने दोघींना जवळ घेऊन शाबासकी दिली. म्हणाली, "आबी कैसा लग्ते बोलो.'
दोघी एकसाथ म्हणाल्या, "लै मस्त लगते. लै कतो लै मज्जा आयी. आबी हामें चौकमेंशेच राऊंड मार्नाले. अन् वूबी रोज एक. आब्यासबिब्यास सब उस्के बाद.'
अम्मीला खूप आनंद झाला. सायकलीच्या रूपात तिच्या रूमीला हळूहळू पंख फुटत होते आणि ही बातमी अब्बूच्या ऐकवण्यासाठी ती खूपच आतुर झाली होती.
लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

X