Warning / आंध्र प्रदेशात मुसळधार, ताशी 205 किमीच्या वेगाने ओडिशावर धडकणार फनी वादळ; शाळा, महाविद्यालये बंद, 103 रेल्वे रद्द

तातडीने मदत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाने हटवली आचारसंहिता

दिव्य मराठी वेब टीम

May 02,2019 12:15:54 PM IST

नवी दिल्ली - हवामान विभागाने बुधवारी फनी वादळाचा इशारा जारी केला आहे. रौद्र रूप घेतलेले हे वादळ शुक्रवारी ओडिशाच्या तटवर्ती परिसरात ताशी 205 किमी वेगाने धडकणार आहे. हे वादळ गोपालपूर आणि चांदबली यांच्यातून जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. ईस्ट कोस्टर्न रेलवेने फनी चक्रीवादळाच्या भीतीने 103 ट्रेन रद्द केल्या आहेत. हवामान विभागाने ओडिशाला यलो वॉर्निंग दिली आहे. निवडणूक आयोगाने येथील 11 जिल्ह्यांमध्ये मदतकार्य तातडीने पोहोचविण्यासाठी आचारसंहिता हटवली आहे. बौध, कालाहांडी, संबलपूर, देवगड आणि सुंदरगडसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे, शाळा आणि महाविद्यालयांना 2 मे पर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशात मुसळधार, ओडिशातून 8 लाख नागरिकांचे स्थलांतर
फनी वादळ ओडिशावर धडकण्यापूर्वीच आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशाच स्वरुपाचे पाऊस गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुद्धा होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ओडिशातील धोकादायक परिसरांतून 8 लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदल, हवाई दल आणि कोस्टगार्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना आणि ओडिशा डिजॅस्टर रॅपिड अॅक्शन फोर्स सुद्धा हायअलर्टवर आहेत. एकट्या भुवनेश्वरमध्ये अग्निशमन दलाच्या 50 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक टीममध्ये 6 सदस्य आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थानिकांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

X
COMMENT