आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचशीलनगरात शाॅर्टसर्किटने लागलेल्या अागीत सिलिंडरचा स्फाेट; ६ घरे खाक, लाखाेंचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील इच्छादेवी मंदिरामागील पंचशीलनगरात मंगळवारी (दि.११) सायंकाळी सात वाजता शाॅर्टसर्कीटने अाग लागली. त्यातच एका घरातील सिलिंडरचा स्फाेट झाला. त्यात ६ घरे पूर्णत: खाक झाली. अनेक घरांना अागीची झळ बसली. स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी ही अाग विझवण्यात रात्री १० वाजता यश अाले. मात्र, ताेपर्यंत लाखाेंची वित्तहानी झाल्याने अापदग्रस्तांना रडू काेसळले. अाग विझवताना दाेन जण जखमी झाले. 


महामार्गालगत ईच्छादेवी मंदिरामागे असलेल्या पंचशीलनगर भागात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. सर्वप्रथम गौतम सोनू सुरवाडे यांच्या पक्क्या घराला आग लागली. आगीची तीव्रता जास्त असल्याने त्यांच्या घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. त्यातून आगीचा भडका उडाला. तर गौतम सुरवाडे यांच्या घराला लागलेल्या अागीने राैद्ररूप धारण केले अन् त्यांच्या घराला लागून असलेल्या आशाबाई रमेश गोपाळ, इब्राहिम साहेबू तडवी, शबाना आरिफ तडवी, इरफान इब्राहिम तडवी, गंगाराम किसन साठे यांच्या पार्टिशनच्या घरांना अागीने कवेत घेतले. त्यामुळे काही क्षणातच अाग परिसरात पसरली. या आगीत सर्वांच्याच घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली अाहे. यातील शबाना तडवी यांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले अाहे. तर आशाबाई रमेश गोपाळ या विधवा महिलेच्या मुलीचा साखरपुडा देखील नुकताच पार पडला अाहे. या आगीत दोघांनी जमवलेला पैसा व दागदागिने जळून खाक झाले अाहेत. त्यामुळे अागग्रस्तांना माेठा धक्का बसला. 


दरम्यान, अग्निशमन दलाच्या ६ बंबांद्वारे रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू होते. तर, घटनास्थळी नवनियुक्त नगरसेवक सुनील महाजन, गफ्फार मलिक, इबा पटेल यांनी धाव घेत पीडितांना भेटून त्यांची अास्थेवाईकपणे विचारपूस केली. महामार्गालगतच्या भागातच आग लागल्याने परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीवर काहिही परिणाम झाला नाही. आगीचे वृत्त कळताच अप्पर पोलिस अधीक्षक लोहित मताणी, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील कुराडे व रामानंद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी मदतीसाठी धावपळ केली. तर दुसरीकडे अागग्रस अाक्राेश करीत असताना त्यांना इतर नागरिक व नातेवाईक धीर देऊन त्यांचे सांत्वन करीत हाेते. तसेच अागगस्तांना परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन राहण्याची व जेवणाची साेय उपलब्ध करुन दिली. 


आग विझवण्यासाठी अनेक जण सरसावले 
आग लागल्यानंतर या परिसरातील विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र अंधार पसरायला होता, तरी नागरिकांनी मोबाइलच्या प्रकाशात मदत कार्य सुरू ठेवले. आग लागल्याचे कळताच विजय लक्ष्मण बोदवडे यांनी एका घरातील सिलिंडर व तेथील तीन बकऱ्यांना मुक्त केल्याने पुढील अनर्थ टळला. तर गौतम सुरवाडे यांनी तत्काळ अग्निशमन विभागला फोन केल्याने लगेचच संबंधित विभागाची मदत मिळाल्याने आग आटोक्यात आणण्यास माेठी मदत झाली. 


मदतीस अडचणी 
पंचशीलनगर व फुकटपुरा भाग अतिशय दाटीवाटीने वसला आहे. त्यामुळे आग विझवताना नागरिकांना प्रचंड त्रास झाला. या भागात रस्ता नसल्याने आगग्रस्त भागापर्यंत आगीचा बंब पोहोचण्यास बराच अवधी लागला. या परिसरात धड रस्ताही नसल्यामुळे नागरिकांनीच सुरुवातीला बचाव कार्य सुरू केले. मिळेल तेथून तसेच जवळच असलेल्या टाकीतून, घरातील व गटारीतील पाणी टाकून लोकांनी आग विझवण्यास मदत केली. 


यांच्या घरांना आग 
पंचशीलनगरामधील अागीत हमाली काम करणारे गंगाराम किसन साठे, बेबाबाई सोनू सुरवाळे, दीपक सोनू सुरवाळे, दिव्यांग असलेले गौतम सोनू सुरवाळे, आशाबाई रमेश गोपाळ, इब्राहिम सायबू तडवी, शबाना आरिफ तडवी, सलिमा इब्राहिम तडवी, इरफान इब्राहिम तडवी, उज्ज्वला सुरवाडे अाणि विजया लक्ष्मण बोदडे आदींचे संसाराेपयाेगी साहित्य, इतर वस्तू, अन्नधान्य, पैसे जळून खाक झाले अाहे. 


विधवा महिलेच्या कुटुंबावर संक्रांत 
आशाबाई रमेश गोपाळ या विधवा महिलेच्या मुलीचा साखरपुडा नुकताच झाला अाहे. काही दिवसांनी त्यांच्या घरात मुलीचे लग्न हाेणार अाहे. त्यामुळे या महिलेने संसारोपयोगी वस्तू घेऊन ठेवल्या होत्या. तसेच अडीअडचणीला साखरपुड्यासाठी तसेच होणाऱ्या मंगल कार्यासाठी त्यांनी काही रक्कम जवळ ठेवलेली होती. ती राेख रक्कम व दाग-दागिने देखील या आगीत जळून खाक झाले. 


लग्नातील साहित्य, दागिने जळाले 
शबाना आरिफ तडवी यांचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले अाहे. नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवणाऱ्या या महिलेच्या डोळ्यादेखत घर खाक झाले अाहे. त्यात त्यांना लग्नात भेट म्हणून मिळालेल्या वस्तू, दागिणे, राेकड असा सर्व एेवज जळून खाक झाला अाहे. गाैतम साेनू सुरवाडे यांची एक बकरी व तिचे दाेन काेकरू अागीत ठार झाले. 

बातम्या आणखी आहेत...