आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर, पानसरे हत्या; पुढील आठवड्यात पुरवणी आरोपपत्र, तपास यंत्रणांनी दिली उच्च न्यायालयात माहिती 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पुढील आठवड्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती सीबीआय आणि राज्याच्या विशेष तपास पथकाने मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी दिली. या दोन्ही हत्या प्रकरणांत आणखी काही आरोपींची अटक झाल्याने पुरवणी आरोपपत्रे दाखल करावी लागणार आहेत. मात्र, फक्त आरोपपत्रे दाखल करून चालणार नसून देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेकडून त्यापेक्षाही अधिक प्रगतीची अपेक्षा असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. विशेष म्हणजे हे भाष्य करताना न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि पोलिसांदरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींचाही उल्लेख केला. 

 

डॉ. दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही तपास यंत्रणांनी आपापल्या तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयात सादर केला. सीबीआयच्या वतीने बाजू मांडणाऱ्या अनिल सिंग यांनी सांगितले, दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अणदुरे आणि शरद कळसकर यांना अटक करण्यात आली असून दोघांविरोधात येत्या १३ फेब्रुवारी रोजी पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे, तर पानसरे हत्या प्रकरणातही आणखी तिघांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणीही येत्या १२ फेब्रुवारी रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने न्यायालयात दिली. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. 

 

आरोपींना रसद पुरवली : न्यायालयाचा पुनरुच्चार 
महत्त्वाच्या प्रकरणात तपास यंत्रणा नेमक्या काय करत आहेत, यावर अवघ्या जगाचे लक्ष असते. तसेच सोशल मीडियामुळे आता कोणती यंत्रणा काय करत आहे, हे लगेचच सर्वतोमुखी होते. ज्या अर्थी आरोपी इतकी वर्षे मोकाट आहेत, त्याअर्थी त्यांना कुठून तरी सारी रसद पुरवली जात आहे, या आपल्या मताचा पुनरुच्चारही न्यायालयाने केला. 
 

बातम्या आणखी आहेत...