Home | Maharashtra | Pune | Dabholkar murder case: CBI took sachin andure to murder place in pune

अणदुरेला घटनास्थळी नेऊन सीबीआयने जाणून घेतला दाभोलकरांच्या हत्येच्या घटनाक्रम

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 08:12 AM IST

सीबीआयच्या अटकेत असलेल्या सचिन अणदुरेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या घटनास्थळी नेऊन शुक्रवारी संपूर्ण घटनाक्रम

 • Dabholkar murder case: CBI took sachin andure to murder place in pune

  पुणे- सीबीआयच्या अटकेत असलेल्या सचिन अणदुरेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या घटनास्थळी नेऊन शुक्रवारी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यात आला. यासाठी ओंकारेश्वर पुलावर (हत्येचे ठिकाण) पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.


  २० अाॅगस्ट २०१३ राेजी सकाळी ओंकारेश्वर पुलावर दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणी सीबीआयने सचिन अणदुरेला अटक केली आहे. हत्येच्या दिवशी आरोपींनी नेमके काय काय केले, याचा संपूर्ण घटनाक्रम अणदुरेकडून जाणून घेण्यात आला. सीबीअायने १८ अाॅगस्टला अणदुरेला अटक केली होती. त्यानंतर त्याला दोनदा पोलिस कोठडी मिळालीली. त्याची मुदत ३० ऑगस्टला संपली. मात्र, या प्रकरणातील अन्य एक आरोपी शरद कळसकर आणि अणदुरे यांची समोरासमोर चाैकशी करावयाची असल्याचे सांगत सीबीआयने कोठडीची मुदत दाेन दिवसांनी वाढवून मागितली होती. ही मागणी मान्य होताच सीबीअायच्या पथकाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत.


  शरद कळसकरचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न
  शरद कळसकर व सचिन अणदुरेची समाेरासमोर चौकशी करण्याची बाब सीबीआयने बोलून दाखवली आहे. कळसकर सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात आहे. त्यामुळे त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी एटीएसकडे संपर्क साधण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी अाणि पिस्तुलाचा शोध घ्यायचा असल्याचेही सीबीअायने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी सचिन अणदुरेची पाेलिस काेठडीची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यास पुणे न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता अाहे.


  काळेसह तिघांचा ताबा मिळण्यात उशीर
  सीबीअायने गाैरी लंकेश खून प्रकरणातील अाराेपी अमाेल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांना दाभाेलकर हत्या प्रकरणात अटक करावयाची असल्याने पुणे न्यायालयातून तिघांविराेधात ३ दिवसांपूर्वी प्राेडक्शन वाॅरंट घेतले अाहे. सध्या हे तिघेही कर्नाटकातील बंगळुरू कारागृहात न्यायालयीन काेठडीत अाहे. त्यांचा ताबा घेण्यासाठी सीबीअायचे पथक शुक्रवारी बंगळुरूस गेले. मात्र, सीबीअायने कारागृहास सादर केलेल्या पत्रात तांत्रिक चूक असल्याने एक दिवस उशिराने ताबा मिळणार अाहे. शनिवारी त्यांनाही पुणे न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

Trending