आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तिच्या’ समर्थ हातांनी झगमगणार दगडूशेठचा ‘विकटविनायक रथ’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयश्री बोकील | पुणे  पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक हा सार्वत्रिक उत्साहाचा आणि चैतन्याचा भाग असतो. मानाच्या पहिल्या पाच गणपतींसह लक्षावधी भाविकांना उत्सुकता असते, ती मानाच्या अखेरच्या पाच गणपतींच्या विसर्जन रथांची...यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. मात्र, या वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या खास विसर्जन मिरवणुकीसाठी घडवण्यात आलेल्या ‘विकटविनायक रथा’ची सर्वत्र चर्चा आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत युवा कार्यकर्त्या शुभांगी वाईकर. दगडूशेठचा विकटविनायक रथ सव्वा लक्ष एलईडी दीपांनी झगमगवण्याची किमया शुभांगी वाईकर यांनी केली आहे. वाईकरांच्या घरात इलेक्ट्रिकल कामांचा तीन पिढ्यांचा वारसा आहे. शुभांगी या वाईकर घराण्याच्या विद्यमान वारसदार आहेत. ‘आजोबा बाबूराव वाईकर, वडील सुहास वाईकर, काका श्याम वाईकर आणि आता मी, असे सगळे याच कामाचा वारसा चालवत आहोत. अर्थात आमचे काम एकट्याचे नसते. संपूर्ण टीम मिळून काम करते. त्यामुळे ‘विकटविनायक रथा‘चे कामही आम्ही दहा जणांच्या टीमने केले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोककाका गोडसे यांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला, त्यामुळेच हे शक्य झाले,’ असे शुभांगी वाईकर म्हणाल्या. अशी झाली प्रक्रिया : सुरुवातीला शिल्पकार विवेक खटावकर यांनी रथाची संकल्पना, आकार, आराखडा आणि डिझाइन करून दिले. दुसऱ्या टप्प्यात त्या डिझाइननुसार प्रत्यक्ष आकार, स्तंभ, कमानी, फुले, वृक्ष, वेली, पक्षी, पाने..हातात आले सर्वप्रथम राजस्थानातील कुशल कारागिरांनी ते रंगवले. त्यानंतर त्यातून किंवा त्यावरून वायरिंग कसे फिरवायचे याचे आराखडे झाले. वायरिंगमधील कोडिंगनुसार लायटिंगची दक्षता घेणे महत्त्वाचे, ते ठरवले. शेवटचा टप्पा प्रत्यक्ष लायटिंगचा असतो. एलईडी दिव्यांत सुतारकामाचे महत्त्व : मंडळाने जवळपास दहा वर्षांनंतर पुन्हा एलईडी दिव्यांची सजावट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाविकांना या रथावर पिवळा, लाल, निळा, हिरवा, मोरपंखी, गुलाबी आणि आमसुली रंगही पाहता येणार आहे. एलईडी दिवे साडेतीन ते आठ एमएम या आकारात मिळतात, असे शुभांगी वाईकर म्हणाल्या.

टीम एकत्र काम करते, श्रेय सगळ्यांचे
एलईडी दिवे मॅन टू मॅन ऑपरेट करावे लागतात. रथाच्या मागच्या बाजूलाच आम्हाला हे सगळे ऑपरेट करण्यासाठी जागा केली आहे. तिथे बसून आमची टीम रथावरील प्रत्येक पॅनल स्वत: ऑपरेट करणार आहे. एमसीबी कंट्रोलमधून विविध प्रकारचे वायरिंग रथभर जोडलेले आहे. मूर्ती, कळस, आभूषणे, रथाचे स्तंभ, फुले, पाने, वेली...असे पॅनलिंगचे प्रोग्रॅमिंग लिखित स्वरूपात केले आहे.  रथाचे श्रेय माझ्या टीमला आहे. - शुभांगी वाईकर, कलाकार

बातम्या आणखी आहेत...